नवी मुंबई : शासनाने रिक्षा परवाने खुले केल्यामुळे शहरातील रिक्षांची संख्या भरमसाठ वाढत आहे. रिक्षा पासिंगही वेळेत होत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. शुक्रवारी दिवसभर पासिंगसाठी रखडावे लागल्यामुळे चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिरंगाईविरोधात परिवहन आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला आहे.
नवी मुंबईमधील रिक्षा व्यवसायासमोरील अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रिक्षांसाठी स्टँड अपुरे पडू लागले आहेत. प्रवाशांची वाट पाहत ताटकळत बसावे लागत आहे. व्यवसायावरही परिणाम झाला आहे. रिक्षांची पासिंगही वेळेवर होत नाही. महाराष्ट्र रिक्षा चालक मालक सेना या संघटनेने या समस्येविरोधात आवाज उठविला आहे. शुक्रवारी नेरूळमधील आरटीओ पासिंग मैदानामध्ये सकाळी सात वाजल्यापासून जवळपास ५५ रिक्षा पासिंगसाठी उभ्या होत्या. दिवसभरात फक्त १५ रिक्षांचे पासिंग झाले. उर्वरित रिक्षा चालकांचा दिवस व्यर्थ गेला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दिरंगाईविषयी चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आरटीओ कार्यालयाकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोपही चालकांनी केला असून, या अन्यायाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
परिवहनने फेटाळले चालकांचे आरोप उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रिक्षाचालकांचे आरोप फेटाळले. रिक्षा व सर्व वाहनांचे पासिंग नियमाप्रमाणे होते. पासिंगसाठी ऑनलाइन अपाॅइंटमेंट घेतली जाते. शुक्रवारी नियमाप्रमाणे कामकाज करण्यात आले आहे. चालकांनी किंवा संघटनांनी घेतलेल्या आक्षेपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
रिक्षा चालकांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. पासिंग वेळेत होत नाही. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अडवणूक केली जात असून, या विरोधात परिवहन आयुक्तांकडे आम्ही तक्रार करणार आहोत. - संतोष चराटे, सरचिटणीस महाराष्ट्र रिक्षाचालक सेना