विमानतळाच्या नामकरणावरून प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष; दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 11:54 PM2021-04-30T23:54:21+5:302021-05-01T06:39:59+5:30
दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह : लढा उभारण्याचा दिला इशारा
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडको संचालक मंडळाने मंजूर करून शासनाकडे पाठविला आहे. या निर्णयाविषयी प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, यासाठी लढा उभारण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त संघटनांनी दिला आहे.
नवी मुंबईमध्ये उभारण्यात येणाऱ्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्त संघटना अनेक वर्षांपासून करीत आहेत. यासाठी पाठपुरावा सुरू असताना २४ डिसेंबरला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधान सचिव व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र देऊन विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची सूचना केली होती.
यानंतर सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नामकरणाचा ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. याविषयी माहिती समजताच प्रकल्पग्रस्त संघटनांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे यासाठी पुन्हा लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. सर्व संघटना व सामाजिक, राजकीय नेत्यांना एकत्रित करून आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.