गर्दुल्ल्यांचे अड्डे बंद होत नसल्याने असंतोष; वाशीसह नेरूळमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 11:47 PM2019-10-29T23:47:59+5:302019-10-29T23:48:17+5:30
पालिकेसह शैक्षणिकसंस्थांनीही दिले पोलिसांना पत्र; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
नामदेव मोरे
नवी मुंबई : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबईमधील उद्याने व मोकळ्या इमारतींसह खाडीकिनारी अमलीपदार्थ ओढणारांचे अड्डे तयार झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही व गर्दुल्ल्यांच्या त्रासामुळे रहिवासी त्रस्त झालेले असतानाही पोलिसांकडून कडक कारवाई केली जात नाही यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. वाशीमधील उद्यानांमधील अड्डा बंद करावा यासाठी महापालिकेसह शैक्षणिक संस्थांनीही पोलिसांना पत्र दिले आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून अमलीपदार्थमुक्त नवी मुंबई करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. अमलीपदार्थविरोधी पथकानेही आयुक्तालय क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी धाडी टाकून अमलीपदार्थांचा साठा जप्त केला आहे. परंतु आयुक्तालय क्षेत्रामधील अमलीपदार्थांच्या विक्रीचे प्रमाण पाहता पोलिसांची कारवाई कमी पडू लागली आहे. सद्य:स्थितीमध्ये शहरातील अनेक उद्याने, मोकळ्या इमारती, खाडीकिनारी असलेल्या मोकळ्या जागांवर गांजा, चरस व इतर अमलीपदार्थ ओढत बसलेल्या तरुणांचे प्रमाण वाढू लागले आहे. उद्यानांमध्ये रात्री उशिरापर्यंत गांजा सेवन सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाशी सेक्टर १० मधील जनरल अरुणकुमार वैद्य उद्यानामध्ये मध्यरात्री उशिरापर्यंत अमलीपदार्र्थांचे सेवन करणारे तरुण बसलेले असतात. दिवसाही या तरुणांचा उद्यानांमध्ये वावर असतो. एक आठवड्यामध्ये गांजा ओढणारांची आपसात भांडणे होऊन दोन जण जखमी झाले होते. या राडेबाजीमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याविषयी प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतर पोलिसांनी काही दिवस येथील गस्त वाढविली. परंतु आता पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.
वाशी सेक्टर १० मधील उद्यानामधील व परिसरातील अमलीपदार्थ ओढणाऱ्या व विकणाऱ्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात बंदोबस्त वाढविण्यात यावा, अशी मागणी महापालिकेच्या वाशी विभाग अधिकाºयांनी पोलिसांकडे केली आहे. याविषयी पत्र वाशी पोलिसांना दिले आहे. याशिवाय येथील साईनाथ हिंदी हायस्कूल, सेंट मेरी स्कूल, वाशी यांनीही पोलिसांना पत्र दिले आहे. परिसरात अमलीपदार्थांची विक्री व सेवन करणाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. वाशीप्रमाणे नेरूळ सेक्टर ६ सारसोळेमधील उद्यान व मैदानामध्येही अमलीपदार्थ ओढणारांचा मोठा अड्डा तयार झाला आहे. काही दिवसांपूर्वी अमलीपदार्थ ओढणाºयांनी रोडवरील गाडीची तोडफोड केली होती. नवरात्रीदरम्यान अमलीपदार्थ ओढणाºया एका तरुणाने येथील सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या छतावर घर केले असल्याचेही निदर्शनास आले होते. कार्यकर्त्यांनी त्याला तेथून हुसकावून लावले आहे. उद्यानामध्ये बसविलेल्या गजेबोमध्ये उशिरापर्यंत गांजा ओढत तरुण बसलेले असतात. हा प्रकार थांबविण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी
कोपरखैरणे, सीवूड, नेरूळ, वाशी, दिघा, एपीएमसी परिसरामध्ये अनेक ठिकाणी उद्यानांमध्ये व मोकळ्या जागांमध्ये गांजा ओढणारे व विकणाºयांचे अड्डे तयार झाले आहेत. नेरूळमधील सारसोळे सेक्टर ६ मधील दत्तगुरू सोसायटीसमोरील उद्यानामध्ये गांजा ओढणाºयांचा मोठा अड्डा आहे. नागरिकांनी एक वर्षामध्ये ५० पेक्षा जास्त वेळा पोलीस नियंत्रण कक्षामध्ये फोन केला आहे. तक्रार केली की पोलीस गस्त घालण्यासाठी येतात. मात्र पुन्हा दुर्लक्ष करतात. येथे काही दिवसांपूर्वी कारचीही तोडफोड करण्यात आली. प्रसाधनगृहाच्या छतावर गर्दुल्ल्याने आश्रय घेतला होता. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतल्यास शहरातील सर्व अड्डे बंद करणे शक्य होऊ शकेल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.