कळंबोली : न्यायालयाच्या निर्बंधांमुळे पनवेल परिसरात दहीहंडी महोत्सवातील निरुत्साहाचे सावट जाणवले. न्यायालयाच्या आदेशाला अधिन राहून उत्सव साजरा करता येत नसल्याने अनेक मंडळांनी उत्सव रद्द करून कित्येक वर्षांची परंपरा खंडित केली, तर काही मंडळांनी पारंपरिक व साध्या पध्दतीने उत्सव साजरा केला.मुंबई, ठाणे या महानगराप्रमाणे पनवेल परिसरातही काही वर्षांपासून दहीहंडी महोत्सवाला चांगले ग्लॅमर प्राप्त झाले होते. या भागात २० पेक्षा जास्त गोविंद पथके आहेतच. त्याचबरोबर दहीहंडी उत्सव मंडळाची संख्याही मोठी होती. पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली, खारघर या ठिकाणी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व नवी मुंबईतील शेकडो गोविंदा पथक येवून सलामी देत तर काही पथक हंड्याही फोडत असत.यंदा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक मंडळांवर अनेक निर्बंध आले आहेत. काही दिवसापूर्वी पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी मंडळाची बैठक घेवून आचारसंहिता आखून दिली. त्याचबरोबर स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत बैठका घेण्यात आल्या. दहीहंडीची मर्यादित उंची, डीजे व साऊंड सिस्टीम न लावणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आदी नियम या वेळी सांगण्यात आले. सिडको आणि महापालिकेने सुध्दा चौकात व रस्त्यावर दहीहंड्या बांधण्यास परवानगी नाकारली होती. गोविंदा पथकाच्या सुरक्षिततेची हमी आयोजकांनी घेणे बंधनकारक होती. तसेच विविध बंधने घालण्यात आले होते. या कारणामुळे नवीन पनवेल परिसरातील मोठ्या दहीहंड्या यंदाही झाल्या नाहीत.खांदा वसाहतीत संजय भोपी सोशल क्लबच्या वतीने दरवर्षी लाखो रुपयांचे बक्षीस असणारी दहीहंडी लावण्यात येत असे. दोन वर्षापासून आयोजकांनी हा उत्सव रद्द केला. क्र ांतीसेवा संघाच्या वतीने शिवासंकुल येथील मोकळ्या जागेत उत्सव साजरा करण्यात आला. मात्र दरवर्षीप्रमाणे डामडौल यंदा दिसून आला नाही. अतिशय पारंपरिक व साध्या पध्दतीने दहीहंडी उत्सव करण्यात आला. कळंबोलीतील जगदीश गायकवाड सामाजिक मित्र मंडळाच्या वतीने मोकळ्या मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र यंदा येथे गणपती कला केंद्र टाकण्यात आले. त्यामुळे येथे उत्सव साजरा करण्यात आला नाही. रोडपालीत सुध्दा सुदाम पाटील या उत्सवाचे आयोजन करीत असत, परंतु या वर्षी उत्सव करण्यात आला नाही. नगरसेवक संतोष शेट्टीच्या श्री. रामशेठ ठाकूर विचार मंचाची श्री रामश्री दहीहंडी उत्सव साजरा झाला. त्याचबरोबर नगरसेवक तेजस कांडपिळे यांच्या वतीने भव्य दिव्य उत्सव करण्यात आला.गोविंदा पथकांनीही फिरवली पाठपनवेल परिसरातील मोठमोठ्या दहीहंडी उत्सव मंडळांनी उत्सव यावर्षी केला नाही. काहींनी तो अतिशय पारंपरिक पध्दतीने साजरा केला. त्यामुळे मुंबई, ठाणे येथील नामांकित गोविंदा पथकाने पनवेलकडे पाठ फिरवली. अतिशय कमी संख्येने गोविंदा पथक पनवेलला आले होते. त्यातच पाऊस नसल्यानेही या उत्सवाचा उत्साह आणखी कमी झाला. त्यामुळे सायंकाळी काही प्रमाणात उत्साह दिसून आला.
दहीहंडी उत्सवावर निर्बंधांचा निरुत्साह; काही ठिकाणी साधा उत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 12:30 AM