लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातात जखमींना तातडीच्या मदतीसाठी मृत्युंजय दूत ही योजना राबवण्यात येत आहे. अपघातानंतर जखमींना तात्पुरत्या जागेवरच उपचार व्हावा आणि अपघातातील जखमींना रुग्णालयात पोहचवण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांच्याकडून तयार केलेल्या गटांना महाडचे उप विभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे यांच्या हस्ते इमर्जन्सी किट आणि स्ट्रेचरचे वाटप करण्यात आले.
महामार्ग वाहतूक शाखा पोलीस महाड यांनी ही योजना राबविण्यासाठी सुरवात केली आहे. या शाखेने आपल्या हद्दीतील ५० नागरिकांची यादी तयार करत वेगवेगळ्या विभागातील ६ गट तयार केले. यांना अपघात संदर्भात सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. मात्र अपघातानंतर जागेवरून वाहनामध्ये टाकण्यासाठी आणि वाहनांमधून उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी स्ट्रेचर तसेच जखमींवर तातडीचे उपचार व्हावे यासाठी इमर्जन्सी किटचे वाटप महामार्ग वाहतूक शाखा पोलीस महाड यांच्याकडून महाडचे उप विभागीय पोलीस अधिकारी नीलेश तांबे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी महामार्ग वाहतूक शाखा महाडचे पोलीस उप निरीक्षक वाय.एम. गायकवाड आदी उपस्थित होते.