महिला दिनानिमित्त दिवाळेत महिलांना ३२ गाळ्यांचे वाटप
By नारायण जाधव | Published: March 8, 2024 03:52 PM2024-03-08T15:52:19+5:302024-03-08T15:52:33+5:30
महिला दिनानिमित्त ३२ महिलांना लॉटरी पद्धतीने या गाळ्यांच्या चाव्या म्हात्रे यांच्या हस्ते सुपुर्द केल्या.
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील संपूर्ण देशातील गावांचे स्मार्ट व्हिलेजचे स्वप्न, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाव दत्तक योजनेंतर्गत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून ‘दिवाळे गाव-स्मार्ट व्हिलेज’च्या अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून फळ-भाजी व्यवसाय करण्यासाठी ३२ महिलांना गाळ्यांचे वाटप केले.
महिलांना सक्षम व स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी म्हात्रे यांनी आमदार निधीतून तब्बल ९२ लाख रुपये खर्च करून त्यांनी ३२ महिलांना हे गाळे उपलब्ध करून दिले आहेत. महिला दिनानिमित्त ३२ महिलांना लॉटरी पद्धतीने या गाळ्यांच्या चाव्या म्हात्रे यांच्या हस्ते सुपुर्द केल्या. यावेळी उद्घाटक म्हणून नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते.
१९९० पासून रस्त्यावर भाजी विकत होते. रस्त्यावर व्यवसाय करताना अनेक संकटे आली. त्यावर मात करून व्यवसाय नियमित सुरू ठेवला. आता मंदाताईच्या आमदार निधीतून गाळा मिळाला. आता व्यवसाय खूप मोठा करायचे ध्येय आहे. मंदाताई यांचे आभार आणि खूप आनंद झाल्याचे मत सुनंदा कोळी यांनी व्यक्त केले.
यावेळी अनंता बोस, नीलकंठ कोळी, तुकराम कोळी, चंद्रकांत कोळी, सुरेखा कोळी, पांडुरंग कोळी, श्याम कोळी, शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता संजय पाटील, उप अभियंता अजय पाटील, कनिष्ठ अभियंता कांचन वानखडे, सहा. आयुक्त शशिकांत तांडेल उपस्थित होते.