दहावीच्या विद्यार्थ्यांना जुन्या स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:42 AM2019-12-14T00:42:33+5:302019-12-14T00:42:53+5:30
प्रत्येक वर्षी नवीन पुस्तिका देण्याची मागणी
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : इयत्ता दहावीला खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या नवी मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून जुन्या स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे. नवीन स्वाध्याय पुस्तिकांमध्ये प्रश्नपत्रिका आणि मूल्यमापन आराखडा बदलण्यात आला असताना, जुन्या स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप झाल्याने मार्च २०२० साली दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणाºया खासगीरीत्या प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्येक वर्षी नव्याने बदल केलेल्याच स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे.
दहावीच्या वर्गात शिकणाºया व नियमित शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांना गृहपाठ, तोंडी परीक्षा आदी अभ्यासक्र म शाळांमधून करवून घेतला जातो. यासाठी २० गुण राखीव असतात आणि वार्षिक परीक्षा ८० मार्कांची घेण्यात येते. दहावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होणाºया विद्यार्थ्यांना या गुणांचा लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सर्व विषयांच्या स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात येते. यासाठी फॉर्म भरते वेळी ११०० रु पये नोंदणी शुल्कही घेण्यात येते.
या वर्षी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, इतिहास, भूगोल आणि गणित विषयांच्या स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे. मराठी आणि हिंदी विषयाच्या स्वाध्याय पुस्तिकांचे अद्याप वाटप करण्यात आले नाही. वाटप करण्यात आलेल्या स्वाध्याय पुस्तिकांमध्ये इंग्रजी विषय वगळता इतर तिन्ही विषयांच्या स्वाध्याय पुस्तिका या सन २०१८-१९ वर्षातील म्हणजेच जुन्या आहेत.
जुन्या स्वाध्याय पुस्तिकेतील प्रश्नपत्रिका आराखडा आणि मूल्यमापन आराखडा यामध्ये मंडळाने बदल केले आहेत; परंतु नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना जुन्या स्वाध्याय पुस्तिका वितरित करण्यात आल्या असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्येक वर्षी संभाव्य प्रश्नांच्या आराखड्यानुरूप नव्याने बदल करण्यात आलेल्या स्वाध्याय पुस्तिका विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील घटकांकडून केली जात आहे.
नवीन स्वाध्याय पुस्तिकेतील प्रश्नपत्रिका आराखडा आणि मूल्यमापन आराखडा यामध्ये बदल करण्यात आला आहे. हा बदल जुन्या स्वाध्याय पुस्तिकेतही करण्यात आला आहे.
- शरद खंडागळे, सचिव, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ