लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या कारणावरून रविवारी रात्री कोपरखैरणेतील रहिवासी रस्त्यावर उतरले होते. या वेळी नागरिकांची समजूत काढण्यासाठी आलेल्या वितरणच्या अधिकाऱ्यालाही नागरिकांनी घेराव घालून अडवून धरले. अखेर परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.रविवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास कोपरखैरणे जिमी टॉवर चौकात हा प्रकार घडला. मागील काही दिवसांपासून कोपरखैरणे परिसरातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. अशातच रविवारी रात्री ८ वाजता खंडित झालेला वीजपुरवठा मध्यरात्रीपर्यंत सुरळीत झाला नाही. यामुळे रात्री १ वाजण्याच्या सुमारास संतप्त रहिवाशांनी वीज वितरणच्या कार्यालयाकडे धाव घेतली; परंतु त्यातूनही काही निष्पन्न न झाल्यामुळे जिमी टॉवर चौकात सुमारे अडीचशे ते तीनशे रहिवाशांचा जमाव जमला होता. त्यांची समजूत काढण्यासाठी वीज वितरणच्या अधिकाऱ्याने त्या ठिकाणी धाव घेतली असता, त्यांनाही जमावाने घेराव घालून सुमारे एक तास त्यांचे वाहन अडवून धरले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर कोपरखैरणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांततेचे आवाहन करून वीज वितरणच्या अधिकाऱ्याची सुटका केली.कोपरखैरणे सेक्टर-१५ ते १८, २२ ते २४, तसेच गावठाण परिसरात सुमारे एक महिन्यापासून वीजपुरवठा खंडित होत आहे. एकीकडे गर्मीने नागरिक त्रस्त असतानाच रात्रीच्या वेळी वीजपुरवठाही खंडित होत असल्याने लहान मुलांसह सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीही वीज वितरणच्या कार्यालयावर मध्यरात्रीच्या सुमारास नागरिकांनी धडक दिली होती. मात्र, त्यानंतरही वीज वितरणच्या कार्यात सुधार न झाल्यामुळे रविवारी रात्री मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले; परंतु अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
वीज वितरणच्या अधिकाऱ्याला घेराव
By admin | Published: June 20, 2017 6:03 AM