आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाचा हँगओव्हर झाल्याने दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा उतारा दिला. जानेवारी ते डिसेंबर २०१६ या कालावधीत तब्बल एक हजार ५८२ गुन्हे दाखल करून चार कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ५६७ आरोपींना कायद्याचा इंगा दाखवत त्यांना गजाआड करतानाच गुन्ह्यातील ८१ वाहने जप्त करण्यात आली.जिल्ह्यामध्ये अवैध मार्गाने मद्याचा व्यवसाय करणारे तसेच तो बाळगणारे, वाहतूक करणारे यांच्यावर कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या संख्येने गावठी मद्यनिर्मितीचा व्यवसाय फोफावला आहे. देशी-विदेशी मद्याच्या तुलनेत गावठी मद्य स्वस्त असल्याने ते पिण्याचा कल अधिक असतो. गावठी मद्यनिर्मिती केल्यावर त्यासाठी सरकारला कोणताच कर भरावा लागत नाही. त्यामुळे गावठी दारूचे भले मोठे अर्थकारण जिल्ह्यात कारवाई केल्यानंतरही सातत्याने सुरूच असते. गावठी मद्य तयार करण्यासाठी आरोग्याला हानिकारक असणाऱ्या पदार्थांचा समावेश केलेला असतो. त्यामुळे त्यावर कडक निर्बंध आहेत. हे माहिती असताना देखील गावठी दारू पिणाऱ्यांची संख्या वाढत असते. त्यामुळे त्याचा व्यवसाय करणारे चांगलेच तेजीत असतात.नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर दारुबंदी व उत्पादन शुल्क विभागाने जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामध्ये त्यांनी एक हजार ५८२ गुन्हे दाखल केले, तर तब्बल चार कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. गुन्ह्यातील ५६७ आरोपींना अटक करून त्यांना गजाआड केले आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांपैकी ८१ वाहने जप्त केल्याचे दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एन.व्ही. सांगडे यांनी सांगितले.
जिल्ह्यात वर्षभरात अवैध दारू व्यवसायाचे १,५८२ गुन्हे दाखल
By admin | Published: January 03, 2017 5:51 AM