जिल्ह्यात यंदा २ हजार ७६८ सार्वजनिक होळ्या
By Admin | Published: March 22, 2016 02:26 AM2016-03-22T02:26:20+5:302016-03-22T02:26:20+5:30
होलिकोत्सवाकरिता जिल्हा सज्ज झाला असून, यंदा रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात एकूण ३ हजार ९०४ ठिकाणी होलिकोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
जयंत धुळप, अलिबाग
होलिकोत्सवाकरिता जिल्हा सज्ज झाला असून, यंदा रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात एकूण ३ हजार ९०४ ठिकाणी होलिकोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये २ हजार ७६८ सार्वजनिक तर १ हजार १३६ खाजगी होलिकोत्सवांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३१७ सार्वजनिक होलिकोत्सव माणगांवमध्ये तर सर्वाधिक १३० खाजगी होलिकोत्सव खोपोलीमध्ये असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
बालगोपाळांच्या पारंपरिक छोट्या होळ््यात जिल्ह्यात गावागावांत प्रारंभ झाला आहे तर कोळी बांधवांच्या पारंपरिक होळीचा सण मंगळवारी साजरा करण्यात येणार आहे. त्याकरिता किनारपट्टीतील गावांतील कोळीवाडे गजबजू लागले आहेत.
जिल्ह्यातील होळी, धूलिवंदन, शिवजयंती व रंगपंचमी या लागोपाठ लागून आलेल्या सणांच्या वेळी जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३६ अन्वये जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
हा आदेश २२ मार्च मध्यरात्री १२ ते २१ एप्रिल २०१६ ला मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अमलात राहाणार आहे.
या आदेशान्वये रायगड जिल्ह्यात पोलीस कार्यक्षेत्रात असलेल्या पोलीस ठाणे स्वाधीन असणाऱ्या अंमलदार व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत तोंडी व लेखी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये मिरवणुकीचा मार्ग ठरवणे, उपासनेच्या जागेवरती किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊन अडथळा निर्माण होऊ नये, देवालये व इतर सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था राखणे, सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे याचे नियमन व नियंत्रण ठेवणे, याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग झाल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये शिक्षा पात्र गुन्हा होईल, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेज हक यांनी केले आहे.