पनवेलमध्ये लवकरच सुरू होणार जिल्हा, सत्र न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:02 AM2019-07-20T00:02:05+5:302019-07-20T00:02:09+5:30
रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यांसाठी पनवेल येथे २७ जुलैपासून जिल्हा व सत्र न्यायालय सुरू होणार आहे.
पनवेल : रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या तालुक्यांसाठी पनवेल येथे २७ जुलैपासून जिल्हा व सत्र न्यायालय सुरू होणार आहे. पनवेल येथे जिल्हा न्यायालयाची इमारत पूर्ण झाली असतानाही येथील जिल्हा न्यायालयाला शासनाच्या न्याय विभागाकडून मान्यता न मिळाल्याने ते सुरू करण्यात आले नव्हते. त्यामुळे पनवेल, उरण, कर्जत व खालापूर येथील नागरिकांना व वकिलांना न्यायालयीन कामकाजाकरिता अलिबागला जावे लागायचे. पनवेलसारख्या मध्यवर्ती ठिकाणी न्यायालय सुरू होणार असल्याने अनेकांची वेळ व पैशाची बचत होणार आहे.
गुरुवार, १८ जुलै रोजी राज्याच्या विधि व न्याय विभागाने अधिसूचना जारी करून पनवेल, उरण, खालापूर व कर्जत या महसुली तालुक्यांसाठी २७ जुलैपासून पनवेलमध्येच अतिरिक्त जिल्हा दिवाणी न्यायालय व सत्र न्यायालय सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल वकील संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या संदर्भात निवेदन दिले होते. तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षेचे गुन्हेगारी खटले असो वा दिवाणी प्रकरणातील अपिले असो; पनवेल, उरण, खालापूर व कर्जत तालुक्यातील लोकांना दोन ते चार तासांचा प्रवास करून अलिबाग जिल्हा दिवाणी व सत्र न्यायालय गाठावे लागत होते. मात्र, आता या चारही तालुक्यांतील जवळपास ८० ते ९० लाख लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सध्या पनवेल न्यायालय संकुलातील एकूण नऊ कोर्टरूमपैकी सहा कोर्टरूममध्ये दिवाणी न्यायालये (वरिष्ठ स्तर) भरतात. आता उर्वरित तीन मोकळ्या कोर्टरूममध्ये
अतिरिक्त जिल्हा दिवाणी व सत्र न्यायालयांचे कामकाज सुरू होणार आहे.
यामुळे आता दिवाणी प्रकरणांत दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्यांविरोधात अपील करण्यासाठी पक्षकारांना अलिबाग जिल्हा दिवाणी न्यायालयात जाण्याऐवजी याच संकुलात अपील करता येणार आहे. त्याचप्रमाणे तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षेविषयीची फौजदारी व गुन्हेगारी प्रकरणेही अलिबाग न्यायालयाऐवजी याच संकुलात चालणार आहेत.