नामदेव मोरे।नवी मुंबई : महानगरपालिकेच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयाच्या प्रमुखांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मनपाऐवजी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे कोरोना झालेल्या अधिकाऱ्यांनी अप्रत्यक्षपणे मनपाच्या रुग्णालयावर अविश्वास दाखवून खासगी रुग्णालयाला पसंती दिली आहे. मनपाच्या वाशी रुग्णालयाचा मृत्युदरही सर्वाधिक असून मनपाचे अधिकारीच तेथे उपचार घेत नसतील तर शहरवासीयांनी मनपाच्या यंत्रणेवर कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १७ हजारांच्या घरात पोहोचली आहे. महानगरपालिका प्रशासनाने पाच महिन्यांत कोट्यवधी रुपये कोरोना नियंत्रणासाठी खर्च केले आहेत. वाशीमध्ये सिडकोच्या प्रदर्शन केंद्रामध्ये १२०० बेडचे रुग्णालय सुरू केले आहे. वाशीतील ३५० बेडच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाचे डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर केले आहे. या रुग्णालयात उपचारामध्ये त्रुटी राहात असल्यामुळे सर्वाधिक मृत्यू येथील रुग्णांचे होत आहेत. रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टर योग्य पद्धतीने लक्ष देत नाहीत. नर्स व इतर कर्मचाºयांच्या भरवशावर उपचार सुरू आहेत. यामुळे मृत्युदर वाढत असल्याचे बोलले जात आहे. रुग्णालयाचे प्रमुख असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. वास्तविक त्यांनी स्वत: वाशी रुग्णालयात उपचार घेणे अपेक्षित होते; पण त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाचा प्रमुखही मनपा रुग्णालयात उपचार घेत नसेल तर सामान्य नवी मुंबईकरांना महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर विश्वास कसा बसेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणारे जवादे हे एकमेव अधिकारी नाहीत. आरोग्य विभागातील इतर प्रमुख पाच डॉक्टरही खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. एनएमएमटीचे वरिष्ठ अधिकाºयांनाही कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयातच दाखल केले होते. महानगरपालिका अधिकाºयांना स्वत:च्याच यंत्रणेवर विश्वास राहिला नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.वाशीमधील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रुपांतर केल्यापासून अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. तेथील वैद्यकीय अधिकारी एसी केबिनमध्ये बसून फक्त आॅर्डर सोडण्याचे काम करतात. स्वत: रोज रुग्णालयात राऊंड मारत नसल्याचे बोलले जात होते. रुग्णांची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी काही डॉक्टर दुर्लक्ष करीत होते. काही नर्स, डॉक्टर मनापासून सेवा करीत होते तर अनेक जण वैयक्तिक सुरक्षेसाठी योग्य पद्धतीने काम करीत नव्हते. यामुळेच मनपा रुग्णालयातील मृत्युदर सर्वांत जास्त आहे. यापूर्वीचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनीही वाशी रुग्णालयातील मृत्युदराविषयी नाराजी व्यक्त केली होती. विद्यमान आयुक्त अभिजित बांगर यांनीही येथील मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत.खर्चाची कमतरता नाही : महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आरोग्य विभागावर प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मनपाची तिजोरी फक्त कोरोना नियंत्रणासाठीच रिकामी केली जात आहे. खर्चामध्ये कुठेही कंजुसी केली जात नाही. परंतु आरोग्य विभागातील काही ठरावीक लोकांच्या कामचुकारपणामुळे दुर्दैवाने मनपाच्याच रुग्णालयात मृत्युदर वाढत चालला आहे.जबाबदार कोण? नवी मुंबईमधील एका खासगी प्रयोगशाळेने कोरोनाचा एक अहवाल चुकीचा दिल्यामुळे ती लॅब बंद करण्याचा निर्णय घेतला. एखाद्या खासगी रुग्णालयाचा मृत्युदर जास्त झाला असता तर मनपाने त्यांनाही नोटीस दिली असती. परंतु महानगरपालिकेच्या वाशीतील कोविड रुग्णालयात सर्वाधिक मृत्यू होत असून त्याला जबाबदार कोण? व निष्काळजीपणा होत असल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.खासगी रुग्णालयांची चलतीमहानगरपालिकेचे अधिकारी कोरोना झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामुळे शहरवासीयांमध्येही मनपाच्या यंत्रणेविषयी विश्वास वाटत नाही. परिणामी नवी मुंबईमधील नागरिकही खासगी रुग्णालयांना पसंती देत आहेत. याचा काही रुग्णालये गैरफायदा घेत असून, भरमसाट बिल आकारत आहेत.खासगी रुग्णालयात हलविल्याने वाचले प्राणच्महानगरपालिकेच्या दिघा नागरी आरोग्य केंद्रातील डॉक्टर सुरेश कुंभारे यांना उपचारासाठी महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु योग्य काळजी न घेतल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर त्यांना कोपरखैरणेमधील खासगी रुग्णालयात दाखल केले.च्महानगरपालिकेचे उपायुक्त अमरीश पटनिगीरे व इतर काही सहकाºयांनी प्रयत्न करून आवश्यक औषधे उपलब्ध करून दिल्यानंतर कुंभारे यांची प्रकृती स्थिर झाली. वाशी रुग्णालयातील एक प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ यांनाही सुरुवातीला मनपा रुग्णालयात दाखल केले होते; परंतु नंतर खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले.