शहरातील अमली पदार्थांचे विघ्न दूर होणार

By admin | Published: September 13, 2016 03:04 AM2016-09-13T03:04:33+5:302016-09-13T03:04:33+5:30

शहरवासियांवरील अमली पदार्थांचे विघ्न दूर करण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. २०१५ मध्ये वर्षभरामध्ये २६ गुन्हे दाखल करण्यात आले होते.

The disturbance of drugs in the city will be overcome | शहरातील अमली पदार्थांचे विघ्न दूर होणार

शहरातील अमली पदार्थांचे विघ्न दूर होणार

Next

नामदेव मोरे , नवी मुंबई
शहरवासियांवरील अमली पदार्थांचे विघ्न दूर करण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. २०१५ मध्ये वर्षभरामध्ये २६ गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु यावर्षी तीन महिन्यातच विक्रमी १६ गुन्हे दाखल झाले आहेत. दोन वर्षानंतर एमडी पावडरची विक्री करणाऱ्या आरोपीलाही अटक केली आहे.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. नैना परिसर, प्रस्तावित विमानतळ, जेएनपीटीमुळे पुढील काही वर्षात ५० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या परिसरात होणार आहे. नवी मुंबई, पनवेल व उरण तालुक्यातील या विकासामुळेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी या परिसरात बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे. गांजा, गुटख्यापासून एमडी पावडरची (मेफेड्रॉन) विक्री होऊ लागली आहे.
उच्च शिक्षणाचे सर्वात मोठे केंद्र म्हणूनही नवी मुंबईची ओळख आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी याठिकाणी येत आहेत. या विद्यार्थ्यांनाही अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढले जात आहे. सिगारेटमधील तंबाखू काढून त्याऐवजी गांजाचा वापर करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. शिक्षणासाठी आलेले अनेक तरूण गांजा कुठे मिळेल, याच्या शोधात फिरत असतानाचे चित्र दिसू लागले होते.
अमली पदार्थांचा विळखा घट्ट होऊ नये, यासाठी पोलिसांनी स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथक सुरू केले आहे. यापूर्वी खंडणी विरोधी पथकाकडून अंमलीपदार्थांवर कारवाई केली जात होती. परंतु जूनमध्ये स्वतंत्र पथक तयार केले असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. पाच वर्षामध्ये सर्वाधिक कारवाई २०१६ मध्ये झाली आहे. या वर्षभरामध्ये एनडीपीएस अंतर्गत २९ गुन्हे दाखल झाले आहेत. यामधील १६ गुन्हे जूनपासून दाखल झाले आहेत. जवळपास ४३ आरोपी गजाआड करण्यात आले आहेत.
जूनपासून शहरातील गांजाचे बहुतांश सर्व प्रमुख अड्डे बंद झाले आहेत. गांजा माफिया टारझनसह अनेकांना गजाआड केले आहे. शहरात एमडी पावडरची विक्री होत असल्याची माहीतीही अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरीष्ट पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस निरीक्षक माया मोरे, पोलीस उपनिरीक्षक अमीत शेलार, राणी काळे व पथकाने तपास सुरू केला होता. ११ सप्टेंबरला रबाळे एमआयडीसीतील अपार इंडस्ट्रीज कंपनीजवळ एकजण एमडी पावडर विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दुपारी दोन वाजता धाड टाकून राफे उर्फ रफिक कदीर खान याला अटक केली आहे. त्याची अंगझडती घेतली असता ४ लाख ३७ हजार किमतीची १७५ ग्रॅम एम. डी. पावडर सापडली. जवळपास दोन वर्षानंतर एमडी पावडर विकणाऱ्यास अटक झाली आहे.



पोलिसांचे टिमवर्क
टिमवर्कमुळे कारवाईमध्ये सातत्य निर्माण झाले आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील गजानन पडळकर, इशार खरोटे, रवींद्र राऊत, कासम पिरजादे,संजयसिंग ठाकूर, मनोज जाधव, अश्विनी चिपळूणकर, सचीन भालेराव,राजेश गाढवे, महेश गवळी, अमोल कर्डीले, अमोर गागरे, सुप्रिया ठाकूर, आकाश मुळे व गोपाळ चव्हाण यांनीही महत्वाची भुमीका बजावली आहे.

 

Web Title: The disturbance of drugs in the city will be overcome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.