नवी मुंबई - मारहाणीच्या दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी बोलवल्याने एका कुटुंबाने पोलिस ठाण्यातच धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. यावेळी तरुणीने स्वतःचे कपडे फाडून घेत पोलिसांवर आरोपाचा प्रयत्न करताच तिला महिला कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. दरम्यान या कुटुंबाला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याठिकाणी देखील त्यांनी गोंधळ केल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
कोपर खैरणे सेक्टर १२ ई (खैरणे) मधील कुलसुम सोसायटीच्या परिस्थितीवरून हा वाद निर्माण झाला आहे. सदर सोसायटीची इमारत जीर्ण झाली असून महानगर पालिकेने सोसायटीला नोटीस पाठवून इमारत धोकादायक असल्याने राहण्यास योग्य नसल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे इमारतीमधील सुमारे २८ रहिवास्यांनी एकत्रित येऊन इमारतीच्या डागडुजीचे काम हाती घेतले आहे. याच इमारतीत ८ बशीर पटेल, रजिया पटेल, रुबिना शेख व हिना शेख यांचे ८ फ्लॅट असून ते भाड्याने दिलेले आहेत. त्यांच्याकडून इमारतीच्या डागडुजीच्या कामाला विरोध होत असल्याचे रहिवास्यांचे म्हणणे आहे.
यावरून रहिवासी व पटेल कुटुंबात वाद झाला असता काही रहिवास्यांना मारहाण करण्याच्या घटना मागील दोन दिवसांपासून होत आहेत. रहिवास्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात चौकशीसाठी त्यांना मंगळवारी कोपर खैरणे पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले होते. त्यानुसार बशीर पटेल, रजिया पटेल, रुबिना शेख व हिना शेख हे पोलिसठाण्यात आले होते. यावेळी हिना यांनी आपली देखील रहिवास्यांविरोधात तक्रार असल्याचा आरोप करत आरडा ओरडा करण्यास सुरवात केली. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जात गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांकडून चौघांनाही शांत राहण्यास सांगितले जात असतानाच महिलांनी स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा प्रयत्न करताच उपस्थित महिला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
न्यायालयातही घातला गोंधळपोलिस ठाण्यात केलेल्या धिंगाण्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात नेले जात असताना त्यांनी पोलिसांना प्रतिकार केला. यानंतरही त्यांना न्यायालयात नेले असता तिथेही त्यांनी न्यायाधीशांसमोर आरडा ओरडा करत गोंधळ घातला. यामुळे न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.