दिवा-रत्नागिरी मेमूला १३ सप्टेंबरपासून अतिरिक्त थांबा
By कमलाकर कांबळे | Published: September 9, 2023 08:27 PM2023-09-09T20:27:45+5:302023-09-09T20:27:56+5:30
गणेशोत्साच्या काळात या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
नवी मुंबई : गणेशोत्सवात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दिवा जंक्शन ते रत्नागिरी मेमूला सापे वामणे स्थानकावर १३ सप्टेंबरपासून अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्साच्या काळात या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने विविध मार्गांवर ५५६ गाड्या सोडल्या आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांशी गाड्यांचे बुकिंग अगोदरच फुल्ल झाले आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीवर असणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना दिलासा देण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिवा जंक्शन ते रत्नागिरी (०११५३) या विशेष मेमूला १३ सप्टेंबरपासून सापे वामणे स्थानकावर अतिरिक्त थांबा दिला आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी ते दिवा जंक्शन (०११५४) या मेमूलाही या स्थानकावर थांबा दिला आहे.
मंगळुरू सेंट्रल ते लोकमान्य टिळक (१२६२०) या मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये थ्री एसी टायरचा एक अतिरिक्त डबा वाढविला आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दिलासा मिळेल, असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे.