नवी मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो आंदोलकांसह मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटलांशी शासनाकडून बुधवारी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड आणि कोकण विभागीय आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी पदयात्रेच्या मार्गात चर्चा करून मनधरणी केल्याचे सांगण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेत जरांगे हे आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने ही चर्चा निष्फळ ठरल्याचे मराठा मोर्चाच्या संयोजकांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत ५४ लाख मराठ्यांच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, ते व त्यांच्या सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली. त्यासाठी तत्काळ अध्यादेश काढावा, या मागणीवर ते ठाम आहेत. याशिवाय मुंबईकडे निघालेला मोर्चा वाटेत थांबवून माघारी फिरण्यास त्यांनी नकार दिला. मुंबईही आमचीच आहे. आम्ही कुणाला त्रास देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.मालकच आरक्षण देतील
मराठ्यांना आरक्षण राज्याचे मालक अर्थात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हेच देतील. त्यांनीच तोडगा काढावा, अशी आमची मागणी आहे. आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत, असे जरांगे यांनी सांगितले. मार्ग बदलास त्यांनी हरकत न घेता सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली.