दिव्यांग विद्यार्थ्याने संगणकावर सोडविला बारावीचा पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 06:01 AM2018-02-22T06:01:44+5:302018-02-22T06:02:00+5:30
उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत प्रथमच संगणकावर उत्तरपत्रिका सोडविण्यास परवानगी देण्यात आली आहे
पनवेल : उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत प्रथमच संगणकावर उत्तरपत्रिका सोडविण्यास परवानगी देण्यात आली आहे. पनवेल येथील के. ए. बांठिया विद्यालयात परीक्षा देणारा अनुराग रोहिदास ठोंबरे हा संगणकावर उत्तरपत्रिका सोडविणारा महाराष्ट्रातील पहिला विद्यार्थी असल्याची माहिती केंद्रप्रमुख डी. एल. शिवरामे यांनी दिली.
उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला बुधवार, २१ फेब्रुवारीपासून सुरु वात झाली. पहिला इंग्रजीचा पेपर होता. या परीक्षेला महात्मा स्कूलचा विद्यार्थी अनुराग रोहिदास ठोंबरे हा कला शाखेतील विद्यार्थी दिव्यांग असल्याने, त्याने मंडळाच्या परवागनी घेऊन संगणकावर पेपर सोडविला. त्यासाठी बांठिया विद्यालयाच्या प्राचार्यांनी २ दिवसांपूर्वी नवीन लॅपटॉप खरेदी केला. त्यामध्ये त्याच्यासाठी खास गुगल आय. एम. ई. मराठी या सॉफ्टवेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच्या सोडविलेल्या उत्तरपत्रिकेची प्रिंट काढून त्याला बारकोड लावून वेगळी जमा करवायची आहे. त्यानंतर, संगणकावरील उत्तरपत्रिका डीलीट करायची आहे.
सराव करून घेतला
अनुरागचे वडील रोहिदास ठोंबरे यांनी सांगितले की, अनुरागचे हस्ताक्षर नीट येत नाही. त्याला दहावीच्या परीक्षेत रायटर घेण्यात आला होता. आम्हाला राज्य मंडळ परीक्षा समितीच्या ३० डिसेंबर २०१७च्या ठराव क्र मांक ४१ची माहिती मिळाल्याने, आम्ही त्याच्याकडून टायपिंगचा सराव करून घेतला होता. जून महिन्यात आम्ही शाळेमार्फत त्याला उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी संगणक वापरण्याची परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्याप्रमाणे, बोर्डाने १५ फेब्रुवारी रोजी आम्हाला परवानगीचे पत्र दिले. केंद्राने त्याला संगणक पुरविण्याबाबत केंद्रप्रमुखांना पत्र देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.