दिव्यांग नागरिकांचे सिडको भवन समोर विविध मागण्यांसाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2021 01:21 AM2021-01-26T01:21:11+5:302021-01-26T01:21:39+5:30
सिडकोने मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
नवी मुंबई : दिव्यांग नागरिकांना स्टॉलसाठी २०० चौरस फुटांची जागा देण्यासह प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संस्थेने सिडको भवन समोर आंदोलन सुरू केले आहे. दिवसभर प्रशासनासोबत झालेली चर्चा निष्फळ झाल्यामुळे बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.
शासनाच्या निर्णयाप्रमाणे दिव्यांग नागरिकांना किमान २०० चौरस फुटांची जागा स्टॉलसाठी देणे आवश्यक आहे. परंतु सिडकाेकडून कमी जागा देण्यात आली आहे. नियमाप्रमाणे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. ज्या दिव्यांग स्टॉलधारकांचे करारनामे झालेले नाहीत, त्यांचे तत्काळ करण्यात यावेत व उर्वरित स्टॉलधारकांचे ६० वर्षांसाठी करारनामे करण्यात यावे. खारघरमधील एक दिव्यांग स्टाॅलधारकाच्या जागेवर ९ वर्षे अतिक्रमण होते. त्यामुळे अतिक्रमण कालावधीमधील भाडे माफ करावे. डेली बाजारच्या जागेत असलेल्या स्टॉलधारकांचे ६० वर्षांसाठी करारनामे करावे अशी मागणी संघटनेने केली आहे. परंतु सिडकोने मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
त्यांनी सिडको भवनसमोर ठिय्या मांडला. अधिकारी, सहव्यवस्थापकीय संचालक यांच्याशी शिष्टमंडळाची दिवसभर चर्चा झाली. परंतु या चर्चेतून मार्ग निघाला नाही. यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रहार अपंग क्रांती संस्थेचे बापुराव काणे, सुरेश मोकल, विशाल वाघमोडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.