दिवाळीच्या तेजोमय दीपोत्सवाचा जल्लोष, एपीएमसीमध्ये आज करोडोची उलाढाल, दिवाळेवासीयांनी समुद्र मंथन करून शोधला देव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 07:02 AM2017-10-19T07:02:24+5:302017-10-19T07:02:32+5:30
दिवाळीनिमित्त नवी मुंबई दिव्यांनी उजळून निघाली आहे. नेरुळमध्ये संगीतमय ‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमाला शेकडो शहरवासीयांनी गर्दी केली होती.
नवी मुंबई : दिवाळीनिमित्त नवी मुंबई दिव्यांनी उजळून निघाली आहे. नेरुळमध्ये संगीतमय ‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमाला शेकडो शहरवासीयांनी गर्दी केली होती. दिवाळे ग्रामस्थांनी समुद्रमंथन करून बहिरीदेवाची मूर्ती शोधून काढली आहे. गुरुवारी मुंबई बाजारसमितीच्या भाजी मार्केटमध्ये सामुदायिक चोपडा पूजनचे आयोजन केले असून दिवाळीनिमित्त वर्षभरातील उधारीचे व्यवहार पूर्ण केल्याने करोडो रुपयांची उलाढाल होणार आहे.
नवी मुंबईमध्ये दिवाळीला पौराणिक पार्श्वभूमी आहे. दिवाळे गावातील बहिरीदेवाची मूर्ती वर्षभर समुद्रामध्ये असते. नरकचतुर्थीच्या दिवशी ग्रामस्थ होड्या घेऊन समुद्रामध्ये जातात व गतवर्षी ज्या ठिकाणी देवाची मूर्ती समुद्रामध्ये ठेवलेली असते तेथे देवाचा शोध घेतात. मंगळवारीही ग्रामस्थांनी प्रथेप्रमाणे समुद्रामध्ये जाऊन देवाची मूर्ती शोधून सायंकाळी गावामध्ये आणली आहे. गुरुवारी देवाची यात्रा असून पालखीसोहळ्याचेही आयोजन केले आहे. शुक्रवारी पुन्हा पारंपरिक पद्धतीने देवाची मूर्ती समुद्रामध्ये सोडली जाणार आहे. ३०० वर्षांपेक्षा जुनी परंपरा ग्रामस्थांनी प्राणपणाने जपली आहे. शहरात प्रत्येक गावामध्ये पारंपरिक पद्धतीने दिवाळी सण साजरा केला जातो. दिवाळीनिमित्त शहरामध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. दोन लाख रुपयापर्यंत सोने खरेदीसाठी पॅन कार्डची सक्ती उठविल्यामुळे सराफा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठीही ग्राहकांनी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. फटाक्यांच्या किमती वाढल्यामुळे यावर्षी फटाक्यांची अपेक्षित विक्री झाली नसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये दिवाळीला विशेष महत्त्व आहे. भाजी मार्केटमध्ये गुरुवारी सामूहिक चोपडा पूजनचे आयोजन केले आहे. दिवाळीनिमित्ताने व्यापाºयांचे पूर्ण कुटुंब मार्केटमध्ये उपस्थित राहात असते. याशिवाय वर्षभर किरकोळ विक्रेत्यांबरोबर उदारी व्यवहार होत असतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व उधारी जमा केली जाते. यामुळे गुरुवारी करोडो रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनीही आवश्यक ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे.
नेरूळमध्ये संगीतमय ‘दिवाळी पहाट’
एनआरबी एज्युकेशनल सोशल अॅण्ड कल्चरल ट्रस्टच्या वतीने आगरी कोळी भवनमध्ये ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन केले होेते. या संगीतमय मेजवानीसाठी नवी मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाची नवीन परंपरा निर्माण होऊ लागली असल्याचे मत प्रेक्षकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक नामदेव भगत व इंदुमती भगत यांनीही नवी मुंबईकरांच्या दिवाळीची सुरुवात संगीतमय वातावरणात व्हावी, यासाठी हा उपक्रम सुरू केला असल्याची माहिती या वेळी दिली.
राहुल देशपांडे यांच्या सुरेल मैफलीने पनवेलकर मंत्रमुग्ध
निरागस सुरांचा फराळ, विरळ धुक्याची झालर, त्यात सुटलेला प्रसन्न पहाट वारा, चंद्रासम भासणारा उगवता सूर्य आणि क्षितिजाला गवसणी घालणारा सूरसम्राट राहुल देशपांडे यांचा सूर व यावर दर्दी रसिकांची भरभरून दाद, अशा संपूर्ण सात्विक व मनमोहक वातावरणाने पनवेल मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते दिवाळी पहाटचे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने बुधवारी स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफल अर्थात ‘दिवाळी पहाट’ कार्यक्र माचे आयोजन शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानावर करण्यात आले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेता परेश ठाकूर यांनी राहुल देशपांडे यांचे स्वागत केले. राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गायनाने ‘दिवाळी पहाट’ रंगली. या कार्यक्रमामध्ये नाट्यसंगीत, अभंग, भक्तिसंगीत, सिनेसंगीतातील गाणी सादर केली गेली. त्यामुळे दिवाळी पहाटेचा हा अनुभव पुढील अनेक दिवसांसाठी नवा उत्साह देणारा ठरला.
बाजारपेठा दरवळल्या
1दिवाळीकरिता बाजारपेठा सजल्या असून, फूलबाजारांमध्ये विविध जातींची फुले दाखल झाली आहेत. दिवाळीकरिता झेंडूच्या फुलांबरोबरच सजावटीच्या फुलांनाही तितकीच मागणी आहे. गुलाब, झेंडू, मोगरा, चमेली यासारख्या स्थानिक फुलांबरोबरच विदेशी जरबेरा, आॅर्किड, कार्निशा या फुलांनाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांचे विशेष महत्त्व असून, त्यामुळे सध्या झेंडूचे भाव ७० ते १२० रुपये किलोपर्यंत आहेत. कमळाची फुलेही १५ ते ३० रु पये प्रतिनग आहेत.
2पूर्वी केवळ निशिगंध, शेवंतीची वेणी आणि झेंडूची फुले यांच्यावरच सण-उत्सव साजरे केले जात असत; परंतु आता या फुलांबरोबरच बुके, फ्लॉवर पॉट यांचा ट्रेंड आला आहे. बुकेंमध्ये विदेशी फुले वापरण्यात येतात. फ्लॉवरपॉटमध्ये फुलांबरोबरच पानांची सजावट केली जाते. विदेशी फुलांची मोठ्या प्रमाणात आयात करण्यात येते. या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे फुलांच्या दरात वाढ झालेली नाही. मात्र, परतीच्या पावसामुळे फुले जास्त काळ टिकत नसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
दिवाळीचा गोडवा
दिवाळीच्या काळात मिठाईला सर्वाधिक मागणी असते. सणाच्या आनंद मिठाईच्या गोडव्यासोबत द्विगुणित करण्यासाठी मिठाईचे चाळीसहून अधिक प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देताना अनेक जण मिठाईचा बॉक्स गिफ्ट म्हणून देतात. ग्राहक आकर्षक बॉक्समधील पॅक केलेल्या मिठाईला सर्वाधिक पसंती देत असल्याने विक्रेत्यांनी अशाप्रकारच्या मिठाईचे बॉक्स ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत. काही प्रकार तर खास दिवाळीसाठी बनविण्यात आले असून, यात चॉकलेट बर्फी, आॅरेंज बर्फी, काजू बर्फी असे प्रकार आहेत. या प्रकारांनाही विशेष मागणी आहे. दिवाळीच्या काळात मिठाईला मागणी तिपटीने वाढते. मिठाईमध्ये काजूच्या बर्फीला चांगली मागणी आहे. बहुतांश ग्राहक हे काजू कतलीच घेतात. याचेही अनेक प्रकार आहेत. जीएसटीचा परिणाम मिठाईवर झाला नसला तरी ड्रायफ्रूटच्या किमती मात्र वाढल्या आहेत.