दिवाळी फराळ 20 टक्क्यांनी महागला, कोरोनामुळे खवय्यांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 12:43 AM2020-11-05T00:43:10+5:302020-11-05T00:43:27+5:30
Diwali : बाजारात तयार फराळ दिवाळीमध्ये विक्रीसाठी ठेवले जातात. नोकरी, व्यवसायानिमित्त ज्या कुटुंबीयांना फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत नाही. असे काही जण तयार फराळाला पसंती देत असतात.
- वैभव गायकर
पनवेल : दिवाळी सणावरही कोरोनाचे सावट पाहावयास मिळत आहे. कोरोनामुळे फराळ खरेदीमध्ये सुमारे ४० टक्के ग्राहकांनी पाठ फिरवली असून, या वर्षी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दिवाळीच्या फराळाच्या किमतीतही २० टक्क्यांची वाढ झाल्याची दिसून येत आहे.
बाजारात तयार फराळ दिवाळीमध्ये विक्रीसाठी ठेवले जातात. नोकरी, व्यवसायानिमित्त ज्या कुटुंबीयांना फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत नाही. असे काही जण तयार फराळाला पसंती देत असतात. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा अनेकांनी या तयार फराळ खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
कोरोनाची भीती, त्यात बाहेरील तेलकट पदार्थ नको, अशी भूमिका काहींनी घेतल्याने फराळ विक्री करणारे बचत गट, दुकानदार या वर्षी आर्थिक संकटात आहेत. दिवाळी म्हटले की गोडधोड फराळाचा बेत हे समीकरणच बनले असताना, कोरोनामुळे फराळ खाणारे खवय्येही गतवर्षीपेक्षा या वर्षी काही प्रमाणात जपूनच अशी भूमिका घेताना दिसून येत आहे.
तयार पदार्थांच्या भीतीने
विक्रीत झाली घट
कोरोनाच्या भीतीमुळे मध्यंतरी मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्या होत्या. या अफवा असल्या, तरी अनेक जण अद्याप कोणत्याही वस्तू अथवा पदार्थ खरेदी करताना खूप विचार करताना दिसून येत आहेत. तेलकट पदार्थ खाऊ नयेत, अशी अनेकांनी धारणा कोरोनामुळे झाल्यानेच, कोरोनाच्या भीतीमुळे तयार फराळाच्या विक्रीत यावेळी मोठी घट झालेली दिसून येत आहे.
लॉकडाऊनमुळे सामानाचा तुटवडा
लॉकडाऊनमध्ये महागाई काही प्रमाणात वाढली आहे. विशेष मध्यंतरी अनेक दुकानांमध्ये सामानाचा तुटवडा भासत असल्याने, या फराळासाठी लागणारे साहित्य (कच्चा माल ) किंमत वाढल्याने त्याचाच परिणाम फराळाच्या किमतींवर पाहावयास मिळत आहे. म्हणून सर्व फराळांच्या किमती १०० ते दिडशे रूपयांनी वाढल्या आहेत.
मागणीत सुमारे ४० टक्के घट झाली आहे. तेलकट पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे.
मात्र, साजुक तुपापासून बनलेल्या बेसनच्या लाडवासारख्या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच चकली, अनारसे, करंजी यांनाही मागणी जास्त आहे. परदेशात नातेवाईकांना पाठविण्यासाठी तयार चिवड्याची मागणी अधिक आहे. मात्र कोरोनामुळे तयार फराळाचे दर हे यावेळी दुपटीने वाढल्याचे चित्र आहे.
या वर्षी कोरोनामुळे फराळच्या ऑर्डर खूप कमी प्रमाणात आलेल्या आहेत. कोरोनाच्या सावटामुळे एकमेकांच्या घरी पाहुणे म्हणून जायला अनेक जण यावेळी टाळणार असल्याने फराळाच्या मागणीत घट झाली आहे. कोरोनामुळे अनेक जण आर्थिक संकटात असल्यानेही मागणीत घट झाल्याचा अंदाज आहे. पण त्याचा फटका आम्हालाही बसत आहे.
- मेघना रगम,
बचत गट, पनवेल