महानगरपालिकेतील ८५ कर्मचाऱ्यांना दिवाळीची अनोखी भेट
By नामदेव मोरे | Published: October 21, 2022 05:39 PM2022-10-21T17:39:21+5:302022-10-21T17:39:39+5:30
२२ कर्मचाऱ्यांची पदोन्नती : ६३ जणांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ
नवी मुंबई: महानगरपालिकेतील ८५ कर्मचाऱ्यांना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. २२ जणांची पदोन्नती करण्यात आली असून ६३ जनांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
स्वच्छता अभियानासह शहराच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये अधिकारी व कर्मचारी यांचे महत्वाचे योगदान आहे. यामुळे आयुक्तांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासही प्राधान्य दिले आहे. १८ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ लिपिक पदावरून उप लेखापाल व ४ उप स्वच्छता निरीक्षकांना स्वच्छता निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
याशिवाय १ शाखा अभियंता, १० जोडारी, ८ प्लंबर, १५ मदतनीस, ५ मीटर वाचक, ७ वायरमन, ७ माळी व १० शस्त्रक्रियागृह सहाय्यक अशा एकूण ६३ अधिकारी, कर्मचारी यांना ३ लाभांचा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. महानगरपालिकेन दिड वर्षामध्ये ३५ संवर्गात ३१५ अधिकारी व कर्मचारी यांची पदोन्नती केली आहे. ५० संवर्गातील ५८३ जणांना आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
पदोन्नती व आश्वासित प्रगती योजनेचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे कर्मचाऱ्यांना आनंद व्यक्त केला आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांचे कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत.