पोलिसांच्या कुटुंबियांसाठी हिवाळ्यातच दिवाळीचा आनंद
By नामदेव मोरे | Published: December 28, 2023 07:36 PM2023-12-28T19:36:13+5:302023-12-28T19:36:28+5:30
नवी मुंबईत राज्यव्यापी रोजगार मेळावा : एक हजारपेक्षा जास्त पोलिसांच्या पाल्यांना मिळाला रोजगार.
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजीत राज्यातील पहिल्या रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला. १०० पेक्षा जास्त कंपन्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला होता. मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील १ हजार पेक्षा जास्त पाल्यांना रोजगार उपलब्ध झाला असून यामुळे हिवाळ्यामध्येच पोलिसांच्या घरामध्ये दिवाळी साजरी झाली.
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेमधून नेरूळमधील आगरी कोळी भवनमध्ये या मेळाव्याचे आयोजन केले होते. ठाणे बेलापूर व तळोजा एमआयडीसीसह शहरातील अनेक नामांकीत कंपन्यांनी पोलिसांच्या मुलांना रोजगार देण्याची तयारी दर्शवून यामध्ये सहभाग घेतला होता. विविध कंपन्यांमधील १९८० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी नवी मुंबई, मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पोलिसांच्या मुलांनी अर्ज केला होता. राज्य राखीव दल व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलांनीही अर्ज केले होते. एक हजार पेक्षा जास्त पाल्यांना एका दिवसामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. रोजगार मिळालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना दिवाळीसारखा आनंद झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
राज्यात प्रथमच पोलीस दलामधील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी अशाप्रकारे रोजगार मेळावा आयोजीत केला होता. या उपक्रमाविषयी पोलिसांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले. पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी सांगितले की २४ तास कर्तव्य बजावण्यात व्यस्त असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना मुलांसाठी फारसा वेळ देता येत नाही. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची रोजगाराची चिंता कमी करण्यासाठी यावर्षीपासून रोजगार मेळावा आयोजीत केला असल्याचे सांगितले. मुख्यालय उपायुक्त संयकुमार पाटील यांनी या मेळाव्यामागील उद्देश व पोलिस कल्याण विभागाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली. यावेळी अतीरिक्त पोलीस आयुक्त दिपक साकोरे, उपायुक्त अमीत काळे, पंकज डहाणे, विवेक पानसरे, अमीत काळे व इतर अधिकारी उपस्थित होते.
पोलिसांच्या पाल्यांना उत्तम दर्जाचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते. भविष्यात कौशल्य प्रशिक्षणावरही भर देण्यात येणार असून राज्यभर उत्तम दर्जाचा राेजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
- मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त नवी मुंबई
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्यावतीने आयोजीत रोजगार मेळाव्यात आयटी क्षेत्रातील रोजगार उपलब्ध झाला आहे. आज आमच्या कुटुंबियांसाठी आनंदाचा क्षण असून हा अत्यंत कौतुकास्पद उपक्रम आहे.
- श्रद्धा काळे, पोलीस पाल्य
जळगावमधील चाळीसगाव येथे वास्तव्यास आहे. वडील पोलीस दलात असून नवी मुंबई पोलिसांच्या राेजगार मेळाव्यात अर्ज केला होता. येथे उत्तम नोकरी मिळाली असल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला असून अशा प्रकारचे मेळावे सर्व ठिकाणी झाले पाहिजेत.
- यश महाजन, जळगाव