लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी केलेल्या आरोपांचे माजी आमदार संदीप नाईक यांनी खंडन केले आहे. स्वत:ची पापे लपविण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करू नका. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकून विरोधकांना मदत करू नये अशा शब्दात त्यांनी आरोप करणारांना सुनावले आहे.
ऐरोलीमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले, किशोर पाटकर, अशोक गावडे यांनी आमदार गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले. झोपडपट्टी पुनर्बांधणीसाठी होणारे सर्वेक्षण, जुन्या इमारतींची पुनर्बांधणीच्या कामात नाईक अडथळे आणत असल्याचे आरोप केले होते. य आरोपांचे माजी आमदार संदीप नाईक यांनी खंडन केले आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजीत पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार चांगले काम करत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास सुरु आहे. अशावेळी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकून विरोधकांना मदत करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आरोप करणारांची पार्श्वभुमी तपासली पाहिजे. हे तिघे म्हणजे नवी मुंबई नाही आणि सरकारही नाही. यांनी त्रास दिलेल्या घटकांची यादी देखील मोठी आहे. आम्ही राजकीय प्रगल्भपणे वागतो म्हणून आमच्या सहनशिलतेचा अंत कोणी पाहू नये. आम्ही सहन करणार नाही असे स्पष्ट केले.
महायुतीमध्ये चांगल वातावरण राहील असाच आमचा प्रयत्न राहिलेला आहे. नवी मुंबईचे हित कोणी जपले हे सर्वांना माहिती आहे. आपली पापे लपविण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करणे योग्य नाही. बिनबुडाचे आरोप कोणी करत असेल तर त्यांच्या विरोधात आब्रू नुकसानीचे गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही संदीप नाईक यांनी दिला आहे.