शहरात कृत्रीम पाणीटंचाई निर्माण करू नका; गणेश नाईक यांचा महापालिकेला इशारा
By कमलाकर कांबळे | Published: December 6, 2023 07:39 PM2023-12-06T19:39:53+5:302023-12-06T19:42:08+5:30
भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला.
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी काही घटकांच्या दहशतीखाली येऊन ठराविक प्रभागांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ही बाब गंभीर असून कृत्रीम पाणीटंचाई निर्माण करून नका, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा मंगळवारी भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला.
गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याबरोबर बैठक घेतली. सलग पाच तास चालेल्या या बैठकीत त्यांनी विविध प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले. विशेषत: पाण्याच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेऊन नवी मुंबईकरांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, असा पवित्रा घेतला. महापालिकेला एमआयडीसीच्या बारवी धरणातून मिळणाऱ्या पाण्यात कपात झाल्याचे वृत्त आहे. तसेच क्षेत्रातील खारघर आणि कामोठे या भागात महापालिकेच्या मोरबे धरणातून ८० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. नवी मुंबईत पाणीटंचाई निर्माण झाली असताना अन्य शहराला पाणी देण्याची गरज आहे का, असा सवाल करून याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा महापालिकेचे काम बंद पाडू , असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.
या बैठकीत नाईक यांनी विविध प्रलंबित प्रश्नांचा उहापोह केला. विशेषत: नवीन पाणी योजनेला गती देणे, मोरबे धरण, सिडको आणि एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांना तातडीने कायमस्वरूपी नोकऱ्या देणे, शिक्षक भरतीतील घोटाळ्याची चौकशी करावी, महापालिकेच्या विधी विभागाची पुनर्रचना करणे, महापालिका रुग्णालयांत तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करणे आदी प्रश्नांचा यात समावेश आहे. या बैठकीला माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.