नवी मुंबई : तुकाराम मुंढे आयुक्त असताना मुख्यालयात व पालिका कार्यालयांमध्ये न फिरकणारे राजकीय पदाधिकारी पुन्हा प्रशासनावर दबाव आणू लागले आहेत. सामान्य पदाधिकारीही आमच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही, तर पत्रकारांना घेऊन तुमच्या कार्यालयात आंदोलन करेन, अशाप्रकारचे इशारे देऊ लागले आहेत. महापालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील एक अधिकाऱ्याच्या केबीनमध्ये दुपारी १ वाजता स्टंटबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या राजकीय पक्षांचे चार कार्यकर्ते प्रवेश करतात. कार्यालयात अधिकारी इतर अभ्यागतांशी चर्चा करत असताना एकक्षणही न थांबता त्यांना फैलावर घेण्यास सुरुवात करतात. ऐरोलीतील तक्रार तुमच्याकडे दिली आहे. तुम्ही अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. आमच्या पक्षाच्या घणसोलीच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अभियंत्यांच्या केबीनमध्ये आंदोलन केले. त्याच्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली; पण आमच्या तक्रारींची दखल घेत नाही. आम्हीही पत्रकारांना घेऊन तुमच्या दालनात आंदोलन करू का? असा इशारा देऊन हे पदाधिकारी निघून गेले.महापालिकेमध्ये तुकाराम मुंढे आयुक्त असताना एकही नगरसेवक, राजकीच पक्षांचे पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत नव्हते. काही कामे असल्यास साहेब प्लीज तेवढे काम करा, अशा विनंत्या करतानाचे चित्र दिसू लागले होते; परंतु काही दिवसांपासून जनाधार नसलेले राजकीय पदाधिकारीही अधिकाऱ्यांना इशारे देऊ लागले आहेत. कार्यालयात घुसून आंदोलन करण्याची भाषा केली जात असून त्यांना आवर कोण व कसा घालणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मनसे काम करतो तिसऱ्या मजल्यावर अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाऊन मनसे काम करत असल्याची भाषा वापरणाऱ्या कार्यकर्त्याला अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये इतरही अभ्यागत बसले आहेत याचे भान राहिले नव्हते. अधिकारी विनंतीपूर्वक तुम्हाला थोड्या वेळात सर्व माहिती दिली जाईल, असे सांगत असतानाही आमच्याच पक्षाच्या इतरांचे तुम्ही लगेच ऐकता व आमचे ऐकत नाही. आम्ही त्यांच्याप्रमाणे पत्रकारांना घेऊन तुमच्या कार्यालयात आंदोलन करू का? असा इशारा देऊनच तेथून निघून गेले.
आंदोलन करण्यास भाग पाडू नका
By admin | Published: May 03, 2017 6:14 AM