नवी मुंबई : विमानतळबाधितांसाठी सिडकोने २२.५ टक्क्यांचे सर्वोत्तम पॅकेज देऊ केले आहे. स्थलांतर होणाऱ्या दहा गावांच्या पुनर्वसनासंदर्भातील बहुतांशी प्रश्न निकाली निघाले आहेत. तरीसुद्धा काही घटकांकडून ग्रामस्थांची दिशाभूल केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या दृष्टीने ही बाब आयोग्य असून, प्रकल्पग्रस्तांनी कोणत्याही भूलथापा आणि अफवांना बळी पडू नये, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पपूर्व कामाने वेग घेतला आहे. विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणाºया दहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न काही प्रमाणात रखडला आहे. या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही, त्यामुळे ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी सिडकोने पुन्हा कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्थलांतर होणाºया दहापैकी गणेशपुरी गावात शनिवारी बैठक घेण्यात आली. या बैठकील सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. पुनर्वसनासंदर्भातील ग्रामस्थांच्या शंका आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक गावासाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकाºयाची नेमणूक करण्यात आली. गणेशपुरी गावासाठी अश्विनी पाटील यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्राजक्ता लवंगारे यांनी या वेळी ग्रामस्थांना दिली. विशेष म्हणजे, ही बैठक सुरू असताना काही घटकांकडून पुनर्वसनाच्या मुद्द्यावर ग्रामस्थांची दिशाभूल केली जात असल्याचे उपस्थित सिडको अधिकाºयांच्या निदर्शनास आले. त्यानुसार ग्रामस्थांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन या वेळी करण्यात आले. गणेशपुरी गावातील २१४ कुटुंबांपैकी १५१ कुटुंबांनी भूखंडाचा भाडेकरार केल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्यामुळे तो पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे प्राजक्ता लवंगारे यांनी या वेळी स्पष्ट केले आहे. दहा गावांच्या स्थलांतराला वेग यावा, प्रकल्पग्रस्तांच्या शंकाचे निरसन व्हावे, या प्रक्रियेत त्यांना भेडसावणाºया विविध प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी, या दृष्टीने प्रत्येक गावासाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकाºयाची नेमणूक करण्यात आली आहे. पुनर्वसनासंदर्भात कोणत्याही शंका असल्यास ग्रामस्थांनी संबंधित अधिकाºयाची भेट घ्यावी, असे आवाहन प्राजक्ता लवंगारे यांनी केले आहे.या बैठकीला उपजिल्हाधिकारी अश्विनी पाटील यांच्यासह सिडकोच्या संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पुनर्वसनासंदर्भातील भूलथापांना बळी पडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 2:58 AM