नागरिकांच्या धार्मिक भावनांशी खेळू नका, शहरवासीयांमध्ये प्रचंड असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 03:52 AM2017-08-24T03:52:59+5:302017-08-24T03:53:05+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण देऊन मंदिरांवर मध्यरात्री कारवाई सुरू केली आहे. शहरवासीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊ लागला आहे.
नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण देऊन मंदिरांवर मध्यरात्री कारवाई सुरू केली आहे. शहरवासीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊ लागला आहे. जुनी मंदिरेही तोडली जात आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रशासनाने नागरिकांच्या धार्मिक भावनांशी खेळू नये, अशा शब्दांत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महानगरपालिकेच्या वतीने धार्मिक स्थळांवर सुरू असलेल्या कारवाईचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीमध्ये उमटले. शिवसेनेच्या द्वारकानाथ भोईर यांनी कारवाईच्या पद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदविले. मध्यरात्री कारवाई केली जात आहे. जी मंदिरे जुनी आहेत, त्यांच्यावरही कारवाई होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. नामदेव भगत यांनीही अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करतो; परंतु प्रशासन चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहे. धार्मिक स्थळांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही. नागरिकांनी पूजेसाठी सोसायटीमध्ये बांधलेली मंदिरेही तोडली जात आहेत. रिक्षाचालकांनी त्यांच्या स्टँडवर उभारलेले देव्हारेही हटविण्यात आले. रोड, मैदान व इतर महत्त्वाच्या ठिकाणी असलेली बांधकामे हटविण्यास कोणी विरोध करत नाही; परंतु नागरिकांनी श्रद्धेने उभारलेली मंदिरे तोडली जात आहेत. आता नागरिकांनी देव-धर्मही सोडून द्यायचे का? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. मध्यरात्री जाऊन कारवाई केली जाते. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. लाठीचार्ज, गोळीबार होऊन कोणाचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.
विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी प्रशासन न्यायालयाच्या आदेशाचे कारण देऊन मंदिरे पाडण्याची घाई करत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण व इतर ठिकाणी प्रशासन एवढी घाई करताना दिसत नाही. मध्यरात्रीच्या कारवाईमुळे लोकांमधील असंतोष वाढला आहे. आमच्या डोळ्यांसमोर श्रद्धास्थाने पाडली जात असल्याने आम्ही हिंदुस्थानामध्येच राहात आहोत का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. विभाग अधिकारी दत्तात्रेय नांगरे पोलीस स्टेशनमध्ये स्वत: जाऊन बंदोबस्तासाठी आग्रह धरत आहेत. त्यांना एवढी कसली घाई झाली आहे. आमची मंदिरे पाडली, आम्हाला काही भावना आहेत की नाही? अशीच स्थिती राहिली तर आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. प्रशांत पाटील यांनीही घणसोलीमध्ये केलेल्या कारवाईविषयी नाराजी व्यक्त केली.
मध्यरात्री धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याची घाई करणे चुकीचे आहे. धार्मिक स्थळेच नसतील तर पूजा-अर्चा करायची कुठे? हा प्रश्न आहे. आयुक्तांनी याविषयी तत्काळ मिटिंगचे आयोजन करावे व त्या मिटिंगला लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात यावे.
- शुभांगी पाटील,
सभापती, स्थायी समिती
मध्यरात्री धार्मिक स्थळे पाडलेली पाहून, आम्ही नक्की भारतामध्येच आहोत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हालाही भावना आहेत. आमच्या भावनांशी खेळू नये. चुकीच्या पद्धतीने होणारी कारवाई थांबविली नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.
- विजय चौगुले,
विरोधी पक्षनेते
प्रशासनाने नागरिकांच्या भावनांशी खेळू नये. मंदिरे बांधण्यासाठी परवानगी देत नाही, जागा उपलब्ध करून देत नाही. जुनी धार्मिक स्थळेही मध्यरात्री जाऊन पाडली जात आहेत. आता नागरिकांनी देव-धर्मही सोडून द्यायचा का?
- नामदेव भगत,
नगरसेवक, शिवसेना
महापालिका २००९ पूर्वीच्या मंदिरांवरही कारवाई करत आहेत. मध्यरात्रीनंतर कारवाई करण्याची आवश्यकता काय? चुकीच्या पद्धतीने होणारी कारवाई तत्काळ थांबविण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
- द्वारकानाथ भोईर,
नगरसेवक, प्रभाग-३०
घणसोलीमधील जुन्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली. अधिकाºयांकडून सुरू असलेल्या कारवाईविषयी नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अधिकाºयांना एवढी घाई का झाली आहे? हेच समजत नाही.
- प्रशांत पाटील,
नगरसेवक-३२