नवी मुंबई : घणसोलीतील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ काढण्याऐवजी महापालिकेकडून नाल्याच्या पिचिंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नाल्याची रुंदी कमी होणार असून पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता परिसरातील नागरिकांकडून वर्तवण्यता येत आहे.
गवळीदेव डोंगर परिसरातून पावसाळ्यात वाहणारे पाणी व एमआयडीसीतील सांडपाणी घणसोलीतील मोठ्या नाल्यातून वाहून नेले जाते. मात्र, अनेक वर्षांपासून या नाल्याची सफाई झाली नसल्याने त्यात अनेक फुटांपर्यंतचा गाळ साचलेला आहे. हा गाळ काढण्यात यावा, अशी परिसरातील नागरिकांकडून सातत्याने मागणी होत आहे. मात्र, प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. परिणामी, नाल्याची खोली कमी झाल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहणारे पाणी नाल्यालगतच्या घरोंदा व सिम्पलेक्स तसेच इतर माथाडी वसाहतींमध्ये घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर प्रतिवर्षी पावसाळ्यात काही तास अतिवृष्टी झाल्यास हा नाला तुडूंब भरून वाहत असतो. हेच पाणी गटारांद्वारे उलट्या प्रवाहाने वाहून नागरी वस्तीतही घुसते. त्यामुळे नाल्यातील गाळ काढण्याची गरज निर्माण झालेली असतानाच, नाल्याच्या दुतर्फा पिचिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. भविष्यात नाल्यातील गाळ काढायचा झाल्यास, त्यात अडथळा निर्माण होणार आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांवर संकट ओढावणार असल्याची भीती सामाजिक कार्यकर्ते संदीप गलुगडे यांनी वर्तवली आहे. तसेच प्रशासनाने उलटा कारभार करत नाल्यातील गाळ काढण्यापूर्वी पिचिंगचे काम सुरू ठेवल्यास तिथला गाळ अधिकाऱ्यांच्या दालनात टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नाल्याच्या भोवती अमृत योजनेअंतर्गत हरित पट्टा तयार करण्यात आलेला आहे. हा हरित पट्टा तयार करण्यापूर्वीच नाल्यातील गाळ काढून सभोवतालची माती ढासळू नये, याकरिता त्या ठिकाणी पिचिंग करणे आवश्यक होते. मात्र, अमृत योजनेअंतर्गतच्या कामांची घाई केली गेल्याने, त्यानंतर वर्षभराने पिचिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, नाल्यातील गाळ तसाच असल्याने पिचिंगची कामे झाल्यानंतर तो कसा काढणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. तर पालिकेने नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीच पिचिंगचे काम हाती घेतल्याने, घणसोलीकरांना पूर परिस्थितीच्या संकटात ढकलण्याचा प्रयत्न होत असल्याचाही संताप व्यक्त होत आहे.