बेकायदा इमारतीतील घरे घेऊ नका

By admin | Published: April 11, 2017 02:22 AM2017-04-11T02:22:40+5:302017-04-11T02:22:40+5:30

विनापरवाना अनधिकृत इमारतीतील सदनिका किंवा व्यावसायिक गाळ्यांची खरेदी करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

Do not take houses in illegal buildings | बेकायदा इमारतीतील घरे घेऊ नका

बेकायदा इमारतीतील घरे घेऊ नका

Next

नवी मुंबई : विनापरवाना अनधिकृत इमारतीतील सदनिका किंवा व्यावसायिक गाळ्यांची खरेदी करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे. तसेच शहरातील बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी विभाग स्तरावर तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या कक्षात आलेल्या अतिक्रमणासंदर्भातील तक्रारीवर कार्यवाही करण्याचे सर्वस्वी अधिकारी संबंधित विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्य सरकारने डिसेंबर २0१५ पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना अभय दिले आहे. त्यामुळे अशा इमारतीतून राहणाऱ्या हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. असे असले आजही शहराच्या विविध भागात अनधिकृत बांधकामांचा धडाका सुरू आहे. रातोरात नवीन झोपड्या उभारल्या जात आहेत. २0१५ पर्यंतच्या बांधकामांना राज्य सरकारने अभय दिले. त्यामुळे त्यानंतरचीही बांधकामे नियमित होतील, अशा भूलथापा देवून अनधिकृत प्रकल्पातील घरे गरजू ग्राहकांच्या माथी मारली जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांना थेट आवाहन केले असून फसवणूक टाळण्यासाठी कोणत्याही बेकायदा प्रकल्पातील सदनिका किंवा व्यापारी गाळ्यांची खरेदी न करण्याचे सूचित केले आहे. घर किंवा गाळे खरेदी करताना संबंधित प्रकल्पाच्या वैधतेची तपासणी करावी, बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र आहे की, नाही याची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांची तक्रार करण्यासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात अतिक्रमणासंदर्भात येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्याचे विभाग अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. अतिक्रमणासंदर्भातील तक्रारींसाठी ८४२२९५५९१२ हा व्हॉटसअ‍ॅप क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना अतिक्रमणांच्या छायाचित्रांसह या क्रमांकावर आपली तक्रार नोंदविता येणार आहे. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरसुध्दा तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Do not take houses in illegal buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.