कळंबोली : कळंबोली वसाहतीत सिडकोने दोन स्वच्छतागृहे बांधली आहेत. मात्र ही स्वच्छतागृहे वापराविना पडून आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छतागृह सुरू करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. मात्र, सिडकोकडून टाळाटाळ केली जात आहे.सिडकोने कळंबोलीत पायाभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. प्राधिकरणाकडून कचरा नियमित आणि वेळेवर उचलला जात नाही. त्याचबरोबर सांडपाण्यावर सुद्धा प्रक्रि या न करता ते होल्डिंग पाँडमध्ये सोडण्यात येत आहे. डास प्रतिबंधात्मक फवारणी वेळेवर केली जात नाही. मोकळ्या भूखंडाची साफसफाई होताना दिसत नाही. एकंदरीत आरोग्याचा प्रश्न वसाहतीत गंभीर बनला आहे. असे असताना सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव दिसून येतो. सिडकोने सेक्टर १० ई मध्ये लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधली आहे. मात्र ती वापराकरिता खुले करण्यात आलेली नाहीत. रोडपाली परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहने उभी केली जातात. त्याचबरोबर बाजूला स्टील मार्केट आहे. त्यामुळे हजारो ट्रक कंटेनर या परिसरात येतात. सार्वजनिक शौचालये बंद असल्याने वाहनचालक, क्लिनर उघड्यावर शौचास बसतात. त्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे.केएलई कॉलेजच्या बाजूला असलेल्या मैदानावर सुद्धा स्वच्छतागृहे बांधून तसेच धूळखात पडून आहे. एकीकडे महापालिका हागणदारीमुक्त अभियान राबवित आहे, तर दुसरीकडे सिडकोने स्वच्छतागृह बांधून तसेच कुलूपबंद ठेवले आहेत. ही शौचालये पे अॅण्ड युजवर सुरू केली तर त्याचा वापर वाहनचालक करू शकतील, असे मुद्दा एकता सामाजिक सेवा संस्थेने उपस्थित केला आहे. महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आपल्या अधिकाºयांना संबंधित स्वच्छतागृहांचा ताब्यात घेवून ते सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्वच्छता निरीक्षक दौलत शिंदे यांनी कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांची भेट घेतली होती. त्यांनी अधिकाºयांना स्वच्छतागृहांचा ताबा मनपाला देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र एका महिन्यानंतरही ही स्वच्छतागृहे बंदच आहेत.
कळंबोलीत स्वच्छतागृह वापराविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:54 AM