रुग्णालयांमधील कामे तत्काळ करा; ऐरोली, नेरुळ रुग्णालयांमधील कामांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 01:14 AM2020-12-29T01:14:01+5:302020-12-29T01:14:12+5:30
महानगरपालिकेने ऐरोली व नेरुळ रुग्णालय बांधून जवळपास सहा वर्षे पूर्ण झाली आहेत.
नवी मुंबई : ऐरोलीसह नेरुळ रुग्णालयातील आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर्ससह गॅस पाइपलाइनची कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावीत. कोणत्याही स्थितीमध्ये १ जानेवारीला चाचणी घेऊन रुग्णालय सुरू करण्यात यावेत, असे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
महानगरपालिकेने ऐरोली व नेरुळ रुग्णालय बांधून जवळपास सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु अद्याप रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. आयुक्तांनी दोन्ही रुग्णालये नवीन वर्षात पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठीच्या कामकाजाचा नियमित आढावा घेतला जात आहे. सोमवारीही यासाठी विशेष बैठकीचे आयोजन केले होते.
पहिल्या टप्प्यात १५ बेड्सचे रुग्णालय सुरू केले जाणार आहे. १० बेडचा आयसीयू वॉर्डही १ जानेवारीपासून सुरू केला जाणार आहे. यासाठी आवश्यक उपकरणे, साहित्य, औषध, डॉक्टर्स, नर्सेस व इतर मनुष्यबळ उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर्स, मल्टिलेटर मल्टिपॅरा मॉनिटर, सिरींज पंम्प, इन्फुजन पम्पची उपलब्धता करण्यात आली आहे. सिव्हिल व इलेक्ट्रिकल कामे दाेन दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. गॅस पाइपलाइनचे कामही तीन दिवसात पूर्ण करण्यात यावे व डॉक्टर, नर्सेस यांची उपलब्धता ३० तारखेपर्यंत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महानगरपालिकेच्या तिन्ही रुग्णालयात डायलेसिस सेवा अत्यंत माफक दरात उपलब्ध आहे. परंतु अद्याप नागरिकांकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही. या सुविधेची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी जनजागृती करण्यात यावी. पोस्ट कोविड उपचार केंद्रांचीही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना करण्यात आल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दयानंद कटके व इतर अधिकारी उपस्थित होते.