चौगुलेंसह सहकाऱ्यांना सर्व पदे द्यायची का?
By admin | Published: April 25, 2017 01:27 AM2017-04-25T01:27:01+5:302017-04-25T01:27:01+5:30
विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंसह त्यांच्याच समर्थकांना सर्व पदे द्यायची का, असा प्रश्न शिवसेनेतील नाराज नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.
नवी मुंबई : विरोधी पक्षनेते विजय चौगुलेंसह त्यांच्याच समर्थकांना सर्व पदे द्यायची का, असा प्रश्न शिवसेनेतील नाराज नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. स्थायी समितीवर निष्ठावंत व नवीन नगरसेवकांनाच संधी दिली जावी, अशी आग्रही भूमिका घेतली असून त्याविषयी म्हणणे पक्षश्रेष्ठींकडे मांडले आहे.
स्थायी समितीवर सदस्य निवडीवरून शिवसेनेमधील मतभेद विकोपाला गेले आहेत. पक्षाच्या जवळपास २० नगरसेवकांनी बेलापूर मतदारसंघाचे संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे यांची भेट घेवून निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. विद्यमान विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना स्थायी समितीवर पाठविण्यात येत असल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. २००७ मध्ये स्थायी समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौगुले यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या. सेनेच्या मदतीने दुसऱ्यांदा सभापतीपद मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या विरोधात बंडखोरी करून अनंत सुतार यांच्यासह ८ जणांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला व ते स्वप्न अपुरे राहिले.
चौगुले यांना यापूर्वी पक्षाने ठाणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. विधानसभेची दोन वेळा उमेदवारी दिली. पक्षाने जिल्हा प्रमुखपद दिले. जिल्हा प्रमुखपदावरून कमी केल्यानंतर अडीच वर्षे जिल्हा प्रमुखपद रिक्त ठेवण्यात आले आहे. २०१४ च्या पालिका निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेते पद देण्यात आले आहे. एवढी सर्व पदे दिल्यानंतर पुन्हा त्यांनाच स्थायी समितीवर पाठविण्यात काय अर्थ आहे. याशिवाय त्यांच्याच समर्थक नगरसेवकांना स्थायी समितीवर वर्णी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्षातील सर्वच पदे चौगुले व त्यांच्या समर्थकांना दिली तर प्रामाणिक, निष्ठावंत, सुशिक्षित नगरसेवकांनी करायचे काय असा प्रश्न त्यांच्याविरोधात बंडखोरी केलेल्या नगरसेवकांनी उपस्थित केला असून, जर त्यांनाच पदे दिली जाणार असल्यास आम्ही राजीनामे देवू असा इशारा दिला आहे.
स्थायी समितीसाठी विजय चौगुले, नामदेव भगत, द्वारकानाथ भोईर, माजी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील, रंगनाथ औटी यांच्याऐवजी नवीन नगरसेवकांना संधी मिळावी अशी मागणी आहे. पक्षामध्ये कोणतीही पदे देत असताना सर्वंकष विचार झाला पाहिजे, असे मत उपनेते विजय नाहटा यांच्याकडेही कळविले असून विठ्ठल मोरे यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत. (प्रतिनिधी)