नोकरी वाचवायची की रुग्ण ?

By admin | Published: April 11, 2016 01:35 AM2016-04-11T01:35:32+5:302016-04-11T01:35:32+5:30

आरोग्यसेवेतील १०२ आणि १०८ या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल स्टाफला बायोमेट्रिक उपस्थित प्रणाली सरकारने बंधनकारक केली आहे

Do you want to save the job? | नोकरी वाचवायची की रुग्ण ?

नोकरी वाचवायची की रुग्ण ?

Next

आविष्कार देसाई,  अलिबाग
आरोग्यसेवेतील १०२ आणि १०८ या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल स्टाफला बायोमेट्रिक उपस्थित प्रणाली सरकारने बंधनकारक केली आहे. रुग्णाचा प्राण वाचविणारा कॉल आधी पूर्ण करायचा की बायोमेट्रिक प्रणालीमध्ये हजेरी पहिली नोंदवायची, असा पेच जिल्ह्यातील सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल स्टाफमध्ये निर्माण झाला आहे. फिल्डवर काम करणाऱ्यांवर याबाबत सक्ती करू नये, असा सूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतून उमटत आहे.
रुग्णांसाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. त्यांना उपचार तातडीने मिळावेत यासाठी सरकारने अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली आहे. ही अत्यावश्यक सेवा असल्याने सर्वसामान्यांना या सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी लक्षात राहणारे १०२ आणि १०८ असे हेल्पलाइन नंबर सुरू केले आहेत. जिल्ह्यामध्ये १०२ सेवा देण्यासाठी ७६ अ‍ॅम्ब्युलन्स असून तेवढेच वाहनचालक आहेत, तर १०८ सेवा देणाऱ्या २२ अ‍ॅम्ब्युलन्स आहेत. यामध्ये २२ वाहनचालक आणि २२ वैद्यकीय अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे अन्य असे सुमारे ३०० अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. सरकारने ७ एप्रिल २०१६ ला जीआर काढला आहे. या जीआरनुसार १०२ आणि १०८ या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल स्टाफला बायोमॅट्रिक उपस्थिती प्रणाली सरकारने बंधनकारक केली आहे. ते सादर केल्यावरच पगार होणार आहे. हा नियम फिल्डवर काम करणाऱ्यांना मात्र अडचणीचा आहे.
पहाटे तातडीचा कॉल आला, तर आधी पंचिग करायचे की कॉल अन्टेंड करायचा, असा प्रश्न आहे. आरोग्यसेवेत काम करताना आधी रुग्णाचे प्राण वाचवण्याला प्राधान्य आहे. काम करूनही वेळेवर पंचिंग झाले नाही तर पगार कापला जाणार आहे. सरकारने याबाबत पूर्ण विचार करण्याची गरज असल्याचा सूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतून उमटत आहे. अ‍ॅम्ब्युलन्स सेवा पुरविणारी भारत विकास संस्था आहे. या संस्थेकडे रोज आॅनलाइन हजेरी अपडेट होते. त्यामुळे नव्याने पंचिंगची काय गरज आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. जे. जे. रुग्णालयात एखाद्या रुग्णाला नेल्यावर तेथे जागा नसते, त्यावेळी त्याला सायन रुग्णालयात न्यावे लागते. तेथेही जागा नसेल तर तिसऱ्या रुग्णालयात न्यावे लागते. पंचिंग करायला पुन्हा मुख्यालयात जावे लागणार आहे. हे अडचणीचे ठरणार आहे असे एका अ‍ॅम्ब्युलन्स चालकाने सांगितले.

Web Title: Do you want to save the job?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.