आरोग्य जागृतीसाठी धावताहेत डॉक्टर
By admin | Published: April 10, 2016 01:07 AM2016-04-10T01:07:46+5:302016-04-10T01:07:46+5:30
नेरूळ ते बोरघाट व पुन्हा नेरूळ असा १२० किलोमीटरचा प्रवास ५४ वर्षीय प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण गायकवाड यांनी ३ एप्रिलला पूर्ण केला. सायकलवरून त्यांचा हा पहिला प्रवास नाही.
- नामदेव मोरे, नवी मुंबई
नेरूळ ते बोरघाट व पुन्हा नेरूळ असा १२० किलोमीटरचा प्रवास ५४ वर्षीय प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण गायकवाड यांनी ३ एप्रिलला पूर्ण केला. सायकलवरून त्यांचा हा पहिला प्रवास नाही. शालेय जीवनापासूनच पोहणे व सायकलिंगची आवड निर्माण झाली. गत २० वर्षांपासून रोज धावण्याचा व्यायाम सुरू केला. एक तासामध्ये १० किलोमीटर अंतर रोज पूर्ण करतात. आठवड्यातून तीन दिवस धावणे, दोन दिवस पोहणे व एक दिवस सायकलिंग सराव अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांनी देश व राज्यातील २० अर्धमॅरेथॉन, ८ फुल मॅरेथॉन व ४२ किलोमीटरपेक्षा जास्ती अंतर असणाऱ्या दोन अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. सायकल व पोहण्याच्याही अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. व्यायामाची आवड स्वत:पुरती मर्यादित न ठेवता मित्र व सहकाऱ्यांनाही त्यासाठी प्रवृत्त केले. यामधून तयार झाला नवी मुंबई रनर्स हा ग्रुप. शहरातील नामांकित डॉक्टर व इतर नागरिक रोज सकाळी धावणे, सायकलिंग व पोहण्याचा व्यायाम करून लागले व आपले अनुभव एकमेकांशी शेअर करू लागले. गायकवाड यांच्या पत्नी डॉक्टर आरती गायकवाड याही रोज किमान एक तास धावण्याचा सराव करीत आहेत. त्यांनी राज्यातील प्रसिद्ध सातारा हिल मॅरेथॉनही पूर्ण केली आहे. २०१५ मधील पुणे ट्रायथॉलन स्पर्धा जिंकली आहे. स्टँडर्ड चॅर्टर्ड मुंबई
मॅरेथॉनसह अनेक नामांकित मॅरेथॉन व अर्धमॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शंतनू देशपांडे, डॉ. सोमनाथ मल्लकमीर, कर्करोगतज्ज्ञ शिशिर शेट्टी, डॉ. अमित घरत, रमेश टिकरे, सुनील कुट्टी, मनीष दुबे, नारायण गडकर, संग्राम करंदीकर व इतर डॉक्टरांनीही राज्यातील अनेक मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. व्यायामामुळे हे सर्व शारीरिक व मानसिकदृृष्ट्या फिट झाले असून, त्यांच्या क्षेत्रामध्येही उत्तम नाव कमविले आहे. रोगमुक्त समाज बनविण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोचविली जात आहे.
आरोग्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम
आरोग्य ही देशातील सर्वात प्रमुख समस्या बनली आहे.
२५ ते ६० या वयातील नागरिकांनाही छोटेमोठे आजार होत असल्यामुळे त्याचा परिणाम देशाच्या क्रयशक्तीवर होत आहे.
२०१४ मध्ये रुग्णालयीन सेवा व औषधांवर तब्बल
" 6,05,605
कोटी रुपये खर्च झाला आहे. प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष दिले तरी देशाच्या अर्थव्यवस्थेवरील काही टक्के भार कमी करता येऊ शकेल.
डॉ. प्रवीण गायकवाड
प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व नवी मुुंबई रनर्स संकल्पनेचे प्रवर्तक डॉ. गायकवाड (५४) यांनी मुंबईमधील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेसह आठ पूर्ण मॅरेथॉन, १० अर्धमॅरेथॉन, दोन अल्ट्रा मॅरेथॉन व अनेक ट्रायथोलान्स स्पर्धांमध्ये सहभाग. आठवड्यातून तीन दिवस रोज १० ते २० किलोमीटर धावणे, दोन दिवस २५ ते ३० किलोमीटर पोहणे व एक दिवस सायकलिंगचा सराव. ३ एप्रिलला नेरूळ ते बोरघाट व पुन्हा नेरूळ असा १२० किलोमीटर सायकलने प्रवास.
डॉ. शंतनू देशपांडे
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ असणारे शंतनू देशपांडे रोज पाच किलोमीटर धावण्याचा सराव करतात. आतापर्यंत आठ हाफ मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. हृदयाची काळजी घेण्यासाठी धावा हा संदेश त्यांनी नागरिकांमध्ये रुजविला असून आतापर्यंत अनेकांना धावण्यासाठी प्रवृत्त केले आहे.
डॉ. सोमनाथ मल्लकमीर
हृदयरोगतज्ज्ञ असणारे डॉ. सोमनाथ रोज १० ते २० किलोमीटर धावण्याचा सराव करीत आहेत. सायकलिंग व पोहण्याचा व्यायाम करीत असून, आतापर्यंत ३ फुल व १३ अर्धमॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. १८० किलोमीटर सायकलिंग, ३.८ किलोमीटर पोहणे व ४२.२ किलोमीटर न थांबता धावण्याची जगातील अवघड इनॉनमॅन ट्रायथॉलॉन स्पर्धा पूर्ण करण्याचे स्वप्न असून, त्यासाठी नियमित सराव करीत आहेत.
डॉ. आरती गायकवाड
राज्यातील प्रसिद्ध सातारा हिल मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या डॉक्टर आरती प्रवीण गायकवाड रोज एक तास धावणे, पोहणे व सायकलिंगचा सराव करतात. २०१५ ची पुणे ट्रायथॉलॉन स्पर्धा त्यांनी जिंकली असून, आतापर्यंत राज्यातील अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये गटामध्ये सहावा क्रमांक मिळविला असून, व्यवसायामध्ये व्यस्त असणाऱ्या महिलांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे.