रुग्णालयाने बिलासाठी अडवला डॉक्टरचाच मृतदेह; आदेशाला केराची टोपली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 02:10 AM2020-09-07T02:10:58+5:302020-09-07T06:45:34+5:30
जीवदान देणाऱ्या कोविड योद्ध्याचे निधन
नवी मुंबई : कोरोनाचा संसर्ग झाल्याने शहरातील डॉक्टरांच्या निधनाची घटना घडली आहे. मात्र, मृत्यूनंतर त्यांच्यावरील उपचाराच्या बिलाची रक्कम न मिळाल्याने रुग्णालयाने त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यास नकार दिला होता. त्यावरून अद्यापही पालिकेच्या आदेशांना खासगी रुग्णालयात केराची टोपली मिळत असल्याचे दिसून येत आहे.
ऐरोली येथे राहणारे नामांकित डॉक्टर विलास कुलकर्णी (६२) यांचे शनिवारी कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी त्यांना वाशीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. मात्र, मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक रुग्णालयात गेल्या असता रुग्णालयाने मृतदेह देण्यास नकार दिला. उपचाराचे साडेचार लाखांचे बिल मिळाले नसल्याचे कारण रुग्णालयाकडून पुढे करण्यात आले.
मेडिक्लेम कंपनीकडून बिल मंजूर झाल्याची पावती दाखवूनही रुग्णालयाकडे रक्कम जमा झालेली नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी हिम्पाम संघटनेसह शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांनी रुग्णालय व्यवस्थापनाची समजूत काढून मृतदेह देण्याची विनंती केली. यानंतरही सुमारे चार तासांनी मृतदेह ताब्यात देण्यात आला. डॉ. विलास कुलकर्णी हे मागील ३२ वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते.
कोरोनाबाधित सर्वसामान्य व्यक्ती व काही डॉक्टरांनाही त्यांनी वेळीच उपचार देऊन मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. तथापि, मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुशंघाने सर्व रूग्णालयांनी विस्तृत कागदपत्रे सांभाळणे आवश्यक आहे मृतदेह सुपुर्त करण्यापूर्वी कागदपत्रांचे विधिवत पालन करणे आवश्यक आहे. विधिवत पालन करुनच टीमने मृतदेहाची औपचारिकता लवकर करण्यासाठी प्रयत्न केले, जेणेकरून अंतिम संस्कार लवकरात लवकर करता येतील, असे फोर्टीज रुग्णालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
बिलाची रक्कम मंजूर झालेली असतानाही ती सिस्टीमवर दिसत नसल्याच्या कारणाने फोर्टिस रुग्णालयाने डॉ. विलास कुलकर्णी यांचा मृतदेह ताब्यात देण्यास टाळाटाळ केली. कोरोनावर उपचारात बिलावरून रुग्ण अथवा नातेवाइकांना वेठीस धरू नये, असे पालिकेचे आदेश आहेत. यानंतरही रुग्णालयाने डॉक्टरचाच मृतदेह अडवून ठेवून कोविड योद्ध्यांचा अपमान केला आहे. - डॉ. सोमनाथ गोसावी, अध्यक्ष हिम्पाम, नवी मुंबई