सूर्यकांत वाघमारे -नवी मुंबई : महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना समान वेतन देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे. याचा लाभ शंभरहून अधिक होमिओपॅथिक डॉक्टरांना होणार आहे. कोविड सेंटरमध्ये सर्व डॉक्टर समान काम करत असतानाही आयुर्वेदिक व युनानीच्या तुलनेत होमिओपॅथिक डॉक्टरांचे वेतन कमी होते.कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी राज्यात सर्वच स्थानिक प्रशासनांमार्फत कोविड सेंटर चालविले जात आहेत. त्याठिकाणी बी.ए.एम.एस. (आयुर्वेदिक), बी.यू.एम.एस. (युनानी) व बी.एच.एम.एस. (होमिओपॅथिक) या तीन वर्गातले डॉक्टर कार्यरत आहेत. नवी मुंबई महापालिकेच्या सर्वच कोविड सेंटरमध्ये या श्रेणीचे डॉक्टर आहेत. मागील एक वर्षांपासून हे सर्व डॉक्टर कोरोना विरुद्धच्या लढ्यात खांद्याला खांदा देऊन झटत आहेत. परंतु सर्व डॉक्टरांचे काम समान असतानाही त्यांच्या वेतनात मात्र फरक होता. आयुर्वेदिक व युनानी डॉक्टरांना ७५ हजार, तर होमिओपॅथिक डॉक्टरांना ६० हजार रुपये वेतन दिले जात आहे. याबाबत होमिओपॅथिक डॉक्टरांकडून नाराजी व्यक्त केली होती, तर समान कामास समान वेतन या कायद्याप्रमाणे वेतन देण्याची मागणी होत होती. त्यानुसार नुकतेच आयुष संचालनालयानेदेखील कोविड सेंटरमधील डॉक्टरांना समान कामास समान वेतन देण्याचे आदेश काढले आहेत. परंतु अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या (हिम्पाम) नवी मुंबई संघटनेने पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी अध्यक्ष डॉ. प्रतीक तांबे, डॉ. एम. आर. काटकर, डॉ. एम. बी. चौधरी, डॉ. प्रशांत आहेर, डॉ. अशोक लांडगे, डॉ. प्रियांका परुळेकर आदी उपस्थित होते. त्यांनी आयुष संचालनालयाच्या आदेशाचा हवाला देत, डॉक्टरांच्या व्यथा मांडल्या. त्यानुसार त्यांच्या मागणी बाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. तसेच प्रत्यक्षात लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले.
शासकीय कोविड सेंटरमधील सर्व डॉक्टर समान काम करत असतानाही, त्यांच्या वेतनातील फरक योग्य नाही. त्यामुळे समान काम, समान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देण्याची मागणी पालिकेकडे करण्यात आली आहे. प्रशासन त्याबाबत सकारात्मक असल्याचे कळवले आहे. महापालिकेने याबाबत निर्णय घेतल्यास राज्यात त्याचे अनुकरण होऊन सर्वच होमिओपॅथिक डॉक्टरांना न्याय मिळू शकेल. - डॉ. प्रतीक तांबे, अध्यक्ष, हिम्पाम, नवी मुंबई