कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर थांबतच नाहीत: रुग्णांशी जीवाशी खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 09:07 PM2024-03-11T21:07:01+5:302024-03-11T21:07:01+5:30
मधुकर ठाकूर/ उरण : गरिब,गरजू ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी असलेल्या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात संध्याकाळी वाजल्यानंतर रात्रभर डॉक्टर थांबत नसल्याने ...
मधुकर ठाकूर/ उरण : गरिब,गरजू ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी असलेल्या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात संध्याकाळी वाजल्यानंतर रात्रभर डॉक्टर थांबत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.आरोग्य केंद्रातील डॉक्टर अभावी होणाऱ्या गैरसोयीमुळे मात्र रुग्णांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उरण परिसरातील गरिब,गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उरण शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र अशी सध्या दोन उपचार केंद्र आहेत.३० खाटांचे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयावर अवघ्या तालुक्याचा भार आहे . दररोज २५० बाह्यरुग्णांची वर्दळ असलेल्या ग्रामीण रुग्णालयावर इतर अनेक कामांचा वाढता ताण आहे.या उलट ग्रामीण भागात असलेले कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे.त्यामुळे उरण परिसरातील विशेषता ग्रामीण भागातील गरीब, गरजु रुग्ण उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आश्रयाला जातात.
मात्र ग्रामीण भागातील गरीब,गरजु रुग्ण उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात.मात्र रात्री सात वाजल्यानंतर या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर थांबत नसल्याने ग्रामीण भागातून रात्रीच्या वेळी साप, विंचू दंश तसेच अन्य रुग्ण उपचारासाठी येतात.मात्र डॉक्टरांअभावी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली आहे.९ मार्च रोजी चिरनेर-खैरकाठी येथे राहणाऱ्या १२ वर्षीय निशा संतोष भगत या मुलीला रात्री ९ वाजताच्या सुमारास विंचू दंश झाला.
परिसरातील प्राणी मित्राच्या मदतीने या मुलीला उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणले होते.मात्र रात्री सात वाजल्यानंतर डॉक्टर आरोग्य केंद्रात थांबत नसल्याने तुम्ही उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देऊन त्यांना माघारी पाठविण्यात आले. नातेवाईकांनी प्राणी मित्रांच्या मदतीने वेळ न दवडता निशा हिला इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.सुदैवाने वेळीच मिळाले.त्यामुळे उपचारानंतर बरी झाल्यावर तिला डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बाळासो काळेल यांनी दिली.
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या फक्त दोनच महिला डॉक्टर कार्यरत आहेत.मात्र दोन्ही महिला डॉक्टर रात्री सातनंतर थांबत नाही.यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ लागली आहे.ही गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती उरण तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र ईटकरे यांनी दिली.