वैभव गायकरपनवेल : कोरोनाची लस सर्वात आधी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लसीच्या साइड इफेक्टच्या भीतीमुळे ही लस दुसऱ्या टप्प्यात घ्यावी, अशी अनेकांची भावना आहे. काही कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत उत्सुकता असली, तरी बहुतांशी कर्मचारी वर्गामध्ये लसीबाबत भीती आहे. कोविडच्या लसीकरणाची तयारी शासनाने पूर्ण केली आहे. नुकतीच सर्वत्र या लसीकरणाची ड्रायरन पार पडली. पनवेल महानगरपालिकेने लसीकरणात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी शासनाला पाठविली आहे.
कोरोनावर अद्याप कोणत्याही औषध उपलब्ध नसल्याने लसीकरण हा एकमेव पर्याय जगभरात समोर आला आहे. भारतातही याची पूर्वतयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या भागात या लसीकरणाची रंगीत तालीम पार पडलीआहे. प्रशासन लसीकरणासाठी सज्ज झाले आहे. लवकरच हे लसीकरण सुरूही होणार आहे. लसीकरणाबाबत अनेक समज गैरसमज निर्माण होत आहेत. याबाबत जनजागृतीची गरज आहे. आरोग्य क्षेत्रीत कार्यरत असलेले काही डॉक्टर्सही पुढे येताना दिसून येत नाहीत. लसीकरणासाठी पालिकेने केलेल्या नोंदणीत अनेक डॉक्टर्सनी लसीकरणासाठी आपले नाव रजिस्टर्ड केले नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात लस घ्यावी की नाही, अशा अवस्थेत आरोग्य विभागातील कर्मचारी आहेत.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांची काय भावना लसीबाबत कोणतीही खात्री नाही. लसीची तीव्रता, तिचे साइड इफेक्ट याबाबत अधिकृत माहिती अद्याप आली नाही. कोरोनाशी लढा देत असताना, नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्तीही प्रभावी ठरत असताना, सरसकट लस घेण्यास सर्व जण पुढे येणार नाहीत. मीही पहिल्या टप्प्यात ही एक लस घेण्यास पुढे धजावणार नाही.
तीन टप्प्यांत लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात खासगी, शासकीय आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात मनपा कर्मचारी, अधिकारी व पोलीस तर तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील वयोवृद्धांना ही लस दिली जाणार आहे. लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. शासनाला कर्मचाऱ्यांची यादी दिली आहे. -डॉ आनंद गोसावी , वैद्यकीय अधिकारी, पनवेल पालिका
कोरोनाची दोन टप्प्यांत लस दिली जाणार आहे. प्रत्येकाला दोन डोस घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक लसीचे काही प्रमाणात साइड इफेक्ट असतात, हे सर्वांना होत नाहीत. काहींना ते काही दिवसांपुरते असतात. सर्व नागरिकांच्या सहकार्यानेच आपला देश कोविडमुक्त होईल- डॉ गिरीश गुणे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, पनवेल