- वैभव गायकर
पनवेल : पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील वैद्यकीय विभागावर लवकरच पालिका प्रशासनाचे नियंत्रण येणार आहे. पालिका क्षेत्रातील डॉक्टर्स, रु ग्णालये आदींनी पालिकेच्या आरोग्य विभागात आपली नोंदणी करणे गरजेचे आहे. याकरिता पालिकेने ३१ डिसेंबर २0१८पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत नोंदणी न केल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्याचा इशारा महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
महापालिका क्षेत्रात कोणताही वैद्यकीय व्यवसाय करण्यापूर्वी संबंधित विभागात रीतसर नोंदणी करणे क्र मप्राप्त आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी यासंदर्भात पालिका क्षेत्रातील डॉक्टर्स, रुग्णालये आदींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार आता पालिका क्षेत्रातील डॉक्टर्स व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागात नोंदणी करणे गरजेचे आहे. पालिकेने यासंदर्भात जाहीर नोटीस देखील काढली आहे. ३१ डिसेंबर २0१८ पूर्वी पालिका क्षेत्रातील डॉक्टर्स व दवाखाने आदींनी पालिकेत नोंदणी करावी. या नोंदणीमध्ये संबंधित दवाखाना, क्लिनिक आदीमधील सुविधा, कर्मचारी वृंद, सेवा सुविधा कोणत्या प्रकारच्या पुरविल्या जाणार आहेत यासंदर्भात माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेने दिलेल्या मुदतीत संबंधितांनी नोंदणी न केल्यास पालिका संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचे देखील आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे आयुक्तांच्या या निर्णयाने पालिका क्षेत्रातील बोगस डॉक्टरांचा विषय देखील चव्हाट्यावर येणार आहे. विशेष म्हणजे नियमांचे उल्लंघन करून दवाखाने व क्लिनिक चालवणारे आपोआपच कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहेत.
पनवेल महानगर पालिका क्षेत्रात खासगी रुग्णालयाची संख्या मोठी आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेल शहरात ३0 पेक्षा जास्त लहान- मोठे दवाखाने आहेत. त्या पाठोपाठ खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदेश्वर आदी ठिकाणचा समावेश आहे. पालिका क्षेत्रात सुमारे ३00 पेक्षा अधिक खासगी रुग्णालये व क्लिनिकचा समावेश आहे.
पालिका क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रावर पालिकेचे नियंत्रण येणार आहे. याकरिता पालिकेच्या आरोग्य विभागात नोंदणीकरिता ३१ डिसेंबर २0१८ ची मुदत संबंधित रु ग्णालय, डॉक्टर्स यांना दिली आहे. या मुदतीपूर्वी संबंधितांनी नोंदणी न केल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल.- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगर पालिका