नवी मुंबई : पाळी कुत्र्यांसाठी वाशी येथे डॉग पार्क बांधण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या संबंधीच्या ठरावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. नवी मुंबईत अशाप्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असल्याने श्वान मालकांनी त्याचे स्वागत केले आहे.सुनियोजित नवी मुंबई शहरात विविध प्रकारच्या नागरी सुविधा आहेत. मुलांना खेळायला मैदाने व उद्याने आहेत; परंतु पाळीव कुत्र्यांसाठी अशाप्रकारची कोणतीही सुविधा शहरात नाही, त्यामुळे वाशी येथील प्रभाग क्रमांक ६४ च्या नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी वाशीच्या सागर विहार जवळील वीर सावकर उद्यानात डॉग पार्क उभारावे, अशा आशयाचा प्रस्ताव महापालिकेला दिला होता. त्यासाठी त्यांचा मागील अनेक महिन्यांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर महापालिकेने त्यास मंजुरी दिल्याने शहरातील पहिले डॉग पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वीर सावकर मैदानातील ७००० चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेवर हे डॉग पार्क उभारले जाणार आहे. त्यासाठी २९ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पार्कमध्ये पाळीव कुत्र्यांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी असणार आहेत.महापालिका कार्यक्षेत्रात एकूण सहा हजार पाळीव कुत्रे आहेत; परंतु या कुत्र्यांसाठी शहरातील कोणत्याही भागात विशेष सुविधा नाहीत, त्यामुळे श्वान मालकांना कुत्र्यांना फिरविण्यसाठी पदपथ, रस्ते किंवा सार्वजनिक उद्यानात घेऊन जावे लागते. त्यामुळे हे कुत्रे रस्ते व पदपथांवर घाण करतात. डॉग पार्कमुळे या प्रकाराला आळा बसणार आहे. कारण या पार्कमध्ये कुत्र्यांना खेळण्याबरोबरच इतर सुविधा असणार आहेत. बंदिस्त पार्कमध्ये एकाच वेळी विविध प्रकारचे खेळ खेळणाऱ्या कुत्र्यांना पाहणे हा शहरवासीयांसाठी नवीन अनुभव घेता येणार आहे. वाशीतील डॉग पार्क हा पायलेट प्रोजेक्ट असून, भविष्यात मागणीनुसार शहराच्या विविध नोडमध्ये अशाप्रकारचा प्रकल्प सुरू करणे शक्य असल्याचे, नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
वाशीत पाळीव कुत्र्यांसाठी डॉग पार्क
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 1:44 AM