श्वान निर्बीजीकरणाला पनवेलमध्ये सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:04 AM2020-01-07T00:04:41+5:302020-01-07T00:04:50+5:30
महापालिका स्थापनेपासून रखडलेल्या पनवेल पालिका क्षेत्रातील श्वान निर्बीजीकरणाला अखेर सुरुवात झाली आहे.
वैभव गायकर
पनवेल : महापालिका स्थापनेपासून रखडलेल्या पनवेल पालिका क्षेत्रातील श्वान निर्बीजीकरणाला अखेर सुरुवात झाली आहे. महिनाभरापूर्वी या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिल्याने जानेवारी महिन्यात प्रत्यक्ष निर्बीजीकरणाला सुरुवात झाली आहे.
पहिल्या टप्प्यात ३२ श्वानांवर यशस्वी शस्त्रकिया करण्यात आली आहे. महापालिकेचे आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.
गेल्या तीन वर्षात पालिका क्षेत्रात मोकाट श्वानांची संख्या झपाट्याने वाढली आहे. निर्बीजीकरण बंद असल्याने पालिका क्षेत्रात जवळपास ५,५०० भटके कुत्रे असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मोकाट कुत्र्यांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या रहिवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
पनवेल पालिकेतील नगरसेवक गुरुनाथ गायकर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.
सध्याच्या घडीला निर्बीजीकरण केंद्राचे काही काम सुरू असल्याने कामाला कामाला गती प्राप्त झालेली नाही. मात्र, अत्यावश्यक परिस्थितीत पालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यावर संबंधित ठिकाणी धाव घेत भटक्या कुत्र्यांना पकडण्यात येत आहे. निर्बिजीकरणासाठी चार प्रभागांत चारही ठिकाणी आरोग्य निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी संबंधित कुत्र्यांवर विशेष खूण केली जाते. शस्त्रक्रिया झाल्यावर श्वानांना पकडलेल्या ठिकाणी सोडले जाते. पनवेल महानगर पालिका क्षेत्रात श्वान निर्बीजीकरणाचे काम इन डिफेन्स आॅफ अॅनिमल या संस्थेला देण्यात आले आहे. पालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभाग कार्यालयात या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध आहेत.
भटक्या कुत्र्यांवर निर्बंध घालण्याची गरज आहे. नागरिकांच्या तक्रारी याबाबत वाढत असल्याने संबंधित निर्बीजीकरणाचे काम युद्ध पातळीवर करण्याची मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
>तक्रारींची त्वरित दखल घेण्याचे आदेश
पालिका क्षेत्रात ज्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी दहशत घातल्याची तक्रार प्राप्त होईल, त्या तक्रारीची त्वरित दखल घेण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.