नवी मुंबई : खोल समुद्रात मनसोक्त विहार करणाऱ्या डॉल्फिन माशांची जोडी वाशी खाडीत आढळल्याने लोकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांपासून डॉल्फिनचे मनोहारी दृश्य सोशल मीडियाद्वारे पाहावयास मिळत असले तरी नवी मुंबईतील सारसोळे गावच्या मच्छीमारांना डॉल्फिनचे प्रत्यक्षात दर्शन घडल्याचे सांगण्यात येते.मुंबईमधील ट्राॅम्बे (माहूल) आणि नवी मुंबईतील सारसोळे खाडीलगत डॉल्फिन जलविहार करताना नवी मुंबईतील सारसोळे कोळीवाड्यातील मच्छीमारांनी प्रत्यक्षात पाहिले. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाल्यामुळे डॉल्फिन मासा हा सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला.खोल समुद्रात आढळणारा हा डॉल्फिन मासा भरकटल्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईच्या मध्यभागी असलेल्या खाडीत आला असावा. मुंबईतील एका मच्छीमाराने या डॉल्फिनचा व्हिडीओ व्हायरल केला असल्याचे नवी मुंबईतील काही मच्छीमारांनी सांगितले. सारसोळे येथील मच्छीमार विकास कोळी, कैलास कोळी, देवा मेहेर आणि राजेश मेहेर यांना डॉल्फिनचे दर्शन घडले. रेवदंडा, मुरूड, आगरदांडा, दिघी या खाडी भागात पूर्वी डॉल्फिन मोठ्या प्रमाणात होते. मात्र कालांतराने समुद्रात वाढलेल्या रेती तसेच कंपनीच्या मालवाहतूक बोटींमुळे डॉल्फिनची संख्या कमी होत गेली.- महेश सुतार, मच्छीमार, वाशी गाव डॉल्फिन समुद्रात क्रीडा करताना दिसत असून खाडीचे पाणी शांत असताना मोठ्या प्रमाणात हे डॉल्फिन जलविहार करतात. अलिबागजवळील खंदेरी आणि उंदेरीच्या खोल समुद्रात अचानकपणे त्यांचे दर्शन होते.- मनोज मेहेर, मच्छीमार
वाशी खाडीत आढळले डॉल्फिन्स, मच्छीमारांना दिसले दोन दिवसांपूर्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 12:23 AM