आकाश गायकवाड, डोंबिवली कल्याण-डोंबिवली -कल्याणमध्ये रिक्षामध्ये बसताना ही रिक्षा कुठल्याही क्षणी पेट घेऊ शकते, हे लक्षात असू द्या. कारण, सध्या डोंबिवलीतील काही जुन्या रिक्षांमध्ये चक्क घरगुती वापराच्या गॅसचा इंधन म्हणून वापर केला जात आहे.कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कल्याण-डोंबिवलीतील रिक्षांची अचानक करण्यात येणारी तपासणी गेल्या काही महिन्यांपासून बंद झाल्याने हे प्रकार वाढल्याचे समजते.कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर धावणाऱ्या जुन्या रिक्षांमध्ये एलपीजी लीडर किटद्वारे घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. इंधनापेक्षा घरगुती गॅसवरील ही रिक्षा चांगली कमाई करून देते. याशिवाय, इंधन जास्त लागत नाही. ठरावीक गॅस एजन्सीचालकांना हाताशी धरून रिक्षामध्ये गॅस भरण्याचे उद्योग काही रिक्षाचालक करीत आहेत. प्रवाशांना गॅस चेंबरवर बसवून हे रिक्षाचालक प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. रात्रीच्या वेळी रिक्षा चालवणारे चालक हे उद्योग करीत असल्याचे बोलले जाते. रिक्षातील गॅस संपला की, शहराबाहेरील एखाद्या झुडुपाच्या मागे अथवा आडोशाच्या ठिकाणी जायचे. तिथे सिलिंडरमधील गॅस रिक्षामध्ये खाली करायचा. पुन्हा रिकामे सिलिंडर गॅस एजन्सीच्या माणसाला नेऊन द्यायचे, अशी पद्धत अवलंबण्यात येते. ६५० रु पयांच्या एका घरगुती गॅस सिलिंडरकरिता ९०० ते १००० रुपये या ब्लॅकच्या दरात गॅस एजन्सीकडून रिक्षाचालक सिलिंडर विकत घेतात.यापूर्वी तत्कालीन कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महिन्यातून दोन ते तीन वेळा अचानक धाड टाकून रिक्षांची तपासणी करीत असत. या कारवाईत जे अनधिकृत रिक्षाचालक सापडायचे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून रिक्षा जप्त करण्याची कारवाई व्हायची. कारवाई टाळण्यासाठी रिक्षाचालक प्रामाणिकपणे व्यवसाय करायचे. मात्र, सध्याचे कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गेल्या वर्षभरापासून अशा अचानक तपासण्या करीत नाहीत, असे काही रिक्षाचालकांनी सांगितले. त्यामुळे दादागिरी करणारे काही रिक्षाचालक योग्य कागदपत्रे, स्वत:चे परमिट नसतानाही व्यवसाय करतात. प्रामाणिकपणे, वाहनतळावर उभे राहून व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांवर अन्याय करतात, असेही सांगण्यात येत आहे. वाहतूक पोलीस आणि कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यात समन्वयाचे वातावरण नसल्याने प्रवाशांना रिक्षाचालकांच्या मनमानीला सामोरे जावे लागते.
डोंबिवलीकरांनो, तुमची रिक्षा पेटू शकते
By admin | Published: January 08, 2016 2:05 AM