एप्रिलपासून घरांच्या किमती वधारणार

By admin | Published: March 29, 2017 05:54 AM2017-03-29T05:54:44+5:302017-03-29T05:54:44+5:30

येत्या १ एप्रिलपासून रेडीरेकनरचे नवीन दर लागू होणार आहे. यात १0 ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत

Domestic prices will rise from April | एप्रिलपासून घरांच्या किमती वधारणार

एप्रिलपासून घरांच्या किमती वधारणार

Next

नवी मुंबई : येत्या १ एप्रिलपासून रेडीरेकनरचे नवीन दर लागू होणार आहे. यात १0 ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे एप्रिलपासून घरांच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून विविध कारणांमुळे बांधकाम उद्योगात मंदीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षी रेडीरेकनरच्या दरात वाढ करू नये, अशी मागणी विकासकांकडून करण्यात येत आहे.
सध्या बांधकाम उद्योगावर मंदीचे सावट आहे. घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तयार माल विकला जात आहे. त्यामुळे विकासकांची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक अडकून पडली आहे. नवी मुंबई क्षेत्रात मोकळ्या भूखंडांनी दराचा उच्चांक गाठल्याने घराच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. शहराच्या विविध विभागात जवळपास पंचवीस हजार सदनिका ग्राहक नसल्याने धूळखात पडून असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मागील दोन-अडीच वर्षात फारसे नवीन गृहप्रकल्प उभारले गेले नाहीत. यातच गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका बांधकाम व्यवसायाला बसला आहे. तसेच गेल्या वर्षभरापासून घरांच्या किमती स्थिर आहेत. त्यानंतरसुध्दा घर खरेदीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. १ एप्रिलपासून रेडीरेकनरचे नवीन दर लागू होणार आहेत. यात १0 ते १५ टक्के वाढ होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे घरांच्या किमती आणखी वाढणार आहे. ही परिस्थिती बांधकाम व्यवसायाला मारक असल्याचे विकासकांचे मत आहे. त्यामुळे किमान या वर्षी राज्य सरकारने रेडीरेकनरच्या दरात वाढ करू नये, अशी मागणी विकासकांनी केली आहे.

स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन शुल्काच्या माध्यमातून राज्य सरकारला महसूल मिळतो. त्यामुळे दरवर्षी या महसुलात वाढ करण्याचा कल सरकारचा असतो. त्यामुळे प्रत्येक वर्षी रेडीरेकनरच्या दरात वाढ केली जाते. याअगोदर १ जानेवारीला रेडीरेकनरचे नवीन दर जाहीर केले जात असे, परंतु गेल्या वर्षीपासून हे दर १ एप्रिल रोजी जाहीर केले जातात.

रेडीरेकनरच्या दरात १0 ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, परंतु प्रत्यक्षरीत्या ही वाढ ३0 टक्केच्या घरात जाते. याचा थेट फटका ग्राहकांना बसतो. सध्या बांधकाम उद्योग अडचणीत आहे. अशा परिस्थितीत रेडीरेकनरच्या दरात वाढ झाल्यास ते या व्यवसायाला मारक ठरणारे आहे.
- प्रकाश बाविस्कर,
अध्यक्ष, एसीएचआय-क्रेडाई,
नवी मुंबई

Web Title: Domestic prices will rise from April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.