घरगुती काटेरी हलवा जातोय काळाच्या पडद्याआड!
By admin | Published: January 8, 2016 01:58 AM2016-01-08T01:58:10+5:302016-01-08T01:58:10+5:30
संक्रांतीच्या १५ दिवस आधी घराघरात कर्त्या स्त्रीकडून बनविला जाणारा नाजूक, रंगीबेरंगी काटेरी हलवा आता हळूहळू काळाच्या पडद्याआड जातो आहे
पालघर : संक्रांतीच्या १५ दिवस आधी घराघरात कर्त्या स्त्रीकडून बनविला जाणारा नाजूक, रंगीबेरंगी काटेरी हलवा आता हळूहळू काळाच्या पडद्याआड जातो आहे. एकेकाळी घरातल्या गृहिणीचा अभिमानाचा विषय असलेला हा हलवा त्याच्या बनविण्याची कष्टप्रद प्रक्रिया, तिला लागणारा प्रचंड वेळ आणि तयार हलव्याची मुबलक उपलब्धता यामुळे आता घराघरात तयार होईनासा झाला आहे.
तीळ, साबुदाणा, फुटाणे, मुरमुरे, वेलचीचे दाणे यावर हा हलवा बनविला जात असे. त्यासाठी पांढऱ्या शुभ्र दाणेदार साखरेच्या एकतारी पाकाचा वापर केला जात असे. तांब्याच्या किंवा पितळेच्या कढई अथवा परातीत लाकडाच्या कोळशाच्या चुलीतल्या मंद धगीवर अत्यंत संथ गतीने छोटा चमचाचमचा पाक टाकून व नाजूक हाताने हलवून तो बनविला जात असे.
जुन्या काळी घराघरांत चुलीवर स्वयंपाक होत असे. त्यासाठी इंधन म्हणून लाकडी कोळशाचा वापर व्हायचा. स्वयंपाक झाला की, चुलीतल्या विस्तवाची तीव्र धग निघून जायची आणि उरलेल्या मंद आचेवर पसरट कढई अथवा परात ठेवून त्यात ज्याच्यावर हलवा करायचा ती चीज टाकली जायची. ती थोडीशी हलवून तापवली की, त्यावर एक छोटा चमचा साखरेचा एकतारी पाक टाकला जायचा आणि तो हलवला जायचा. हा पाक कोरडा झाला की, मग दुसरा चमचा, मग तिसरा चमचा पाक टाकला जायचा. सर्व रंगाचा हलवा एकत्र केला की, काटेरी बहुरंगी हलवा तयार व्हायचा. आताच्या धावपळीच्या आयुष्यात एवढी मेहनत करण्याइतकी फुरसत कोणालाच नाही. शिवाय २०० रुपये ते ६०० रुपये किलो दराने वेगवेगळ्या प्रतीचा हलवा बाजारात मिळत असल्याने घरी हलवा कुणालाच करावासा वाटत नाही. करायचे म्हटले तरी ते शक्य होत नाही. रेडिमेड मिळणारा हलवा हा दुकानदान अथवा निर्माते कान असलेल्या मोठ्या कढईत तीळ, चुरमुरे टाकून त्यावर पाक टाकून कढई हलवून झटपट बनवित असल्याने तो तितकासा काटेदार होत नाही. तरी पण धावपळीच्या जगता संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी सगळयांना तो घ्यावासा, खावासा आणि वापरावासा वाटतो, एवढे मात्र नक्की!