नवी मुंबई : मागील ४८ तासांत शहराच्या विविध भागांतून ७ मुले बेपत्ता झाल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचप्रमाणे व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडियावरून सुद्धा यासंबंधीच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यामुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचेनवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी गुरुवारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन चर्चा केली.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून ४८ तासांत सात अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. यात पाच मुली आणि तीन मुलांचा समावेश आहे. यातील काही मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असले तरी अशा प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी माजी खासदार संजीव नाईक यांच्या समवेत पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन चर्चा केली. अल्पवयीन मुले गायब होण्याच्या प्रकाराबाबत गांभीर्याने पावले उचलण्याची विनंती नाईक यांनी पोलिस आयुक्तांना केली. दरम्यान व्हाॅट्सॲप आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टकडे नागरिकांनी दुर्लक्ष करावे आणि त्याचप्रमाणे पालक आणि शिक्षकांनी जागरूक राहावे, असे आवाहन संदीप नाईक यांनी केले आहे.