नवी मुंबई : अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रातोरात उभ्या राहणाऱ्या अशा बेकायदा इमारतीत घरे घेणाऱ्यांची फसवणूक होत आहे. विशेष म्हणजे सिडकोकडून अशा बांधकामांना वेळोवेळी नोटीस बजावूनही बांधकामे पूर्ण करून त्यातील घरे विकली जात आहेत. या पार्श्वभूमीवर सिडकोने पुन्हा एकदा जाहीर आवाहन केले असून, पूर्वी नोटीस बजावलेल्या जवळपास २०० बेकायदा बांधकामांची यादी जाहीर केली आहे. तसेच या बांधकाम प्रकल्पांमध्ये घरे विकत न घेण्याचे आवाहन केले आहे.
सिडको आणि संबंधित प्राधिकरणांच्या अर्थपूर्ण चुप्पीमुळे अनधिकृत बांधकामांचा प्रश्न जटील बनला आहे. गावठाण क्षेत्रातील मोकळ्या जागा बळकावून त्यावर सर्रासपणे टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. त्यातील घरे तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त असल्याने गरजूंची फसवणूक होत आहे. मागील काही वर्षांत अशापक्रारच्या अनधिकृत इमारतींचे लोण दक्षिण नवी मुंबईत पसरले आहे. विशेषत: खारघर, उलवे, तळाेजा, कोंबडभुजे, तरघर, कोपर, गणेशपुरी आणि उरण या परिसरात अशा बेकायदा बांधकामांचे पेव फुटले आहे.
या विभागात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांना सिडकोने १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत नोटीस बजावल्या होत्या. मात्र, त्यानंतरही यातील अनेक बांधकामे पूर्ण करण्यात आली असून, त्यातील घरे विक्रीसाठी सज्ज झाली आहेत. त्यामुळे स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या गरजूंची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिडकोने या सर्व बांधकामांची त्यांना पूर्वी बजावलेल्या नोटीसच्या तपशिलासह वृत्तपत्रात यादी प्रसिद्ध केली असून, कोणीही या प्रकल्पांमध्ये घरे घेऊ नयेत, असे आवाहन केले आहे.
एनएमएमसी क्षेत्रातील बांधकामांकडे दुर्लक्ष सिडकोने दक्षिण नवी मुंबईतील जवळपास दोनशे बेकायदा बांधकामांची यादी जाहीर केली आहे. परंतु, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील फक्त एकाच बांधकामाचा यात समावेश आहे. प्रत्यक्षात मात्र नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आजही मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. एकट्या ऐरोलीत आजमितीच शंभरपेक्षा अधिक बांधकामे सुरू आहेत. त्यापाठोपाठ गोठीवली, घणसोली, कोपरखैरणे, जुहूगाव, वाशीगाव, सानपाडा आदी ठिकाणी बेकायदा बांधकामांचा धडाका सुरू आहे. विशेष म्हणजे बोनकोडे गावात शासकीय जमिनीवर टोलेजंग इमारतीचे काम सुरू आहे. त्याकडे महापालिकेसह सिडकोने सोयीस्कररित्या डोळेझाक केल्याचे दिसून आले आहे.