आमदारकीसाठी आग्रह धरू नका, देवेंद्र फडणवीसांनी सांगितला इच्छुकांचा आकडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 06:57 AM2022-07-24T06:57:46+5:302022-07-24T07:00:15+5:30
देवेंद्र फडणवीस; सर्वांसाठी मंत्र्यांच्या सीट नाही
वैभव गायकर
पनवेल : राज्यपाल नियुक्त बारा आमदारांसाठी बाराशे जणांचे बायोडाटा माझ्याकडे आले आहेत. काही जागा आपल्याला शिवसेनेलाही द्याव्या लागतील. मंत्रिमंडळ विस्तारातही जागा नाहीत, सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. आमदारकीसाठी आग्रह न धरता त्यागाची तयारी ठेवा, असा सबुरीचा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील इच्छुकांना दिला.
येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप फडणवीस यांच्या भाषणाने झाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, प्रदेश प्रभारी सी. टी. रवी, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी मेहनतीच्या आधारावर पुढे यावे. त्यांना त्यागाची भूमिका स्वीकारावी लागेल. मंत्रिमंडळ विस्तारात येऊ शकतील, असे अनेक ज्येष्ठ आहेत; पण सर्वांचाच विचार करता येणार नाही, असे सांगत विस्तार काहीसा धक्कादायक असेल, असे संकेतही फडणवीस यांनी दिले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा उल्लेख करताना त्यांनी हे सर्व अचानक घडले नव्हते. हे सर्व ठरवून घडले होते, असे सांगून टाकले. या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा होती. मोदींच्या आशीर्वादामुळे हे सर्व घडले. अमित शहा, जे. पी. नड्डा हे नेते भक्कमपणे पाठीशी उभे राहिले, असे फडणवीस म्हणाले.
शिवसेना- राष्ट्रवादीचे साटेलोटे निवडणुकीपूर्वीच
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विधानसभा निवडणुकीपूर्वीच साटेलोटे होते. भाजपचे उमेदवार पाडले गेले. निवडणुकांचा निकाल येताक्षणी शिवसेना नेते आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत होते. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेत येण्यासाठी नंबर जुळवत होते. मी वारंवार फोन केले; पण मला प्रतिसाद दिला गेला नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.