नवी मुंबई : हल्लीची पत्रकारिता आवाहनात्मक बनली आहे. समाज माध्यमांमुळे पत्रकारितेची व्याख्या बदलू लागली आहे. त्यामुळे पत्रकारांनी ब्रेकिंग न्यूजच्या मागे न धावता बातमीच्या मुळाशी जाण्याची सवय लावून घ्यावी, असे आवाहन ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी केले आहे.
नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत अशोक जालनावाला यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त जालनावला फाउंडेशनने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पत्रकारिता आजची आणि उद्याची, या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित केला होता. या कार्यक्रमाला आमदार गणेश नाईक आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. अशोक जालनावाला यांची पत्रकारिता समाजाभिमुख होती. समाजाला दिशा दाखविण्याचे काम त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून केले आहे. त्यामुळे आजच्या पत्रकारांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असा सल्लाही नाईक यांनी याप्रसंगी दिला. तर आमदार मंदा म्हात्रे यांनी स्व. अशोक जालनावाला यांच्या पत्रकारितेचे कौतुक केले.
आपल्या लेखनीतून त्यांनी अनेकांना न्याय दिला. अनेकांची राजकीय कारकीर्द घडविली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जालनावाला यांनी पत्रकरिता केली, असे गौरवोद्गार त्यांनी वेळी काढले. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक विजय कुवळेकर, पराग करंदीकर आणि राजकीय विश्लेषक राजू परूळेकर या वक्त्यांनी पत्रकारिता आजची आणि उद्याची या विषयावर मार्गिक विश्लेषण केले.
या कार्यक्रमाला माजी खासदार संजीव नाईक, कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, शिवसेनेचे शहरप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विठ्ठल मोरे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय मोहिते उपस्थित होते. महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी सूत्रसंचालन तर जालनावाला फाउंडेशचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी आभार मानले.