सिडकोकालीन बालवाडीच्या इमारतीची झाली धर्मशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:05 AM2018-04-12T03:05:15+5:302018-04-12T03:05:15+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी मार्केटजवळ सिडकोकालीन बालवाडीचे धर्मशाळेत रूपांतर झाले आहे.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी मार्केटजवळ सिडकोकालीन बालवाडीचे धर्मशाळेत रूपांतर झाले आहे. या इमारतीमध्ये स्टॉल्सचालकाने व कँटीन चालविणाऱ्यांनी अतिक्रमण केले असून, गोडावनाप्रमाणे त्याचा वापर सुरू केला आहे. सिडको व महापालिका प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.
भाजी मार्केट व विस्तारित भाजी मार्केच्या मध्ये सिडकोने बालवाडी सुरू करण्यासाठी इमारत बांधली होती. त्या ठिकाणी बालवाडीचे वर्ग सुरूही केले होते; पण अनेक वर्षांपासून या इमारतीचा काहीही वापर केला जात नाही. दोन वर्षांपासून या इमारतीमध्ये अतिक्रमण होऊ लागले आहे. पूर्वी भाजी मार्केटमधील खोके व इतर वस्तू या ठिकाणी ठेवल्या जात होत्या. मागील काही महिन्यांपासून येथील एक पानटपरीचालकाने या इमारतीमध्ये गोडाऊन सुरू केले आहे. पाण्याच्या बॉटल व इतर वस्तू ठेवल्या जात आहेत. याशिवाय येथे अनधिकृतपणे खानावळ सुरू केली आहे. खाद्यपदार्थ बनविले जात आहेत; पूर्ण इमारतीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. इमारतीचा वापर नक्की कोण करतो? याची कोणतीही माहिती महापालिका, सिडको व पोलीस प्रशासनाला नाही.
बाजारसमितीमध्ये असलेली ही वास्तू महापालिकेने ताब्यात घेऊन तिचा योग्य वापर करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. बाजारसमिती प्रशासनानेही संबंधित आस्थापनांना याविषयी कळवावे, अशी मागणी भारतीय विद्यार्थी सेनेचे बेलापूर उप विधानसभा संघटक गणेश पावगे यांनी केली आहे. बाजारसमितीमधील व्यापारी व कामगारांनीही ही इमारत अतिक्रमणमुक्त करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याविषयी ठोस उपाययोजना केली नाही, तर या इमारतीमध्ये अवैध व्यवसाय सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
>सिडकोकालीन बालवाडीमध्ये घुसखोरी झाली आहे. ही इमारत सिडको किंवा महापालिकेने ताब्यात घेऊन तिचा योग्य उपयोग करावा.
- गणेश पावगे,
उपविधानसभा अध्यक्ष, भारतीय विद्यार्थी सेना